मुंबई, 23 मुंबई : स्वत:च्या मालकीचं एक घर (Home) असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपलं घर कसं असावं याबाबत प्रत्येकाच्या मनात काही ना काही कल्पना असतात. त्यानुसार आपण घर बांधण्याचा किंवा खरेदी करण्याचा विचार करतो; मात्र सध्याच्या काळात जमिनीचे आणि घरांचे दर (House Prices) मोठ्या प्रमाणात वाढल्यानं घर खरेदी करण्यासाठी आयुष्यभराची कमाई पणाला लावावी लागते. दिल्ली-मुंबई यांसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये (Cosmopolitan Cities) स्वत:च्या मालकीचं तर सोडाच, पण भाड्यानं घर घेणंदेखील सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये नवीन घराची स्वप्नं बघणाऱ्यांसाठी आणखी एक वाईट आली बातमी आहे. सध्या बांधकाम साहित्याच्या (Construction Material) किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गृहकर्जाचे व्याजदरसुद्धा महागले आहेत. रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना म्हणजेच 'क्रेडाई'नं (CREDAI) दिलेल्या माहितीनुसार, घरांच्या किमतींमध्ये लवकरच 10 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, जे घर सध्या 25 लाख रुपयांना उपलब्ध आहे त्याची किंमत 27.50 ते 28.75 लाख रुपये होऊ शकते. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून महागाई (Inflation) वाढली आहे. बांधकाम साहित्याच्या किमतीवरही या महागाईचा परिणाम झाला आहे. स्टील (Steel), सिमेंट (Cement), विटा (Bricks) यांसारख्या बांधकाम साहित्याच्या किमतीमध्ये सातत्यानं वाढ नोंदवली जात आहे. तसंच मजुरांची रोजंदारीही वाढत आहे. दुसरीकडे, देशातल्या प्रमुख बँका आता गृह कर्जाच्या (Home Loan) दरवाढीच्या विचारात आहेत. असं झाल्यास येत्या काळात नागरिकांना होम लोनवर जास्त व्याज द्यावं लागेल. याचाच अर्थ होम लोनचा ईएमआय (EMI) वाढेल. याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये घरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे पुरवठा कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असेल तर महागाई वाढते, हा साधा-सोपा नियम घरांच्या बाबतीत सध्या लागू होत आहे.
वैयक्तिक माहिती शेअर करा आणि 6000 रुपये मिळवा! पोस्टाची ऑफर किती खरी? वाचा सविस्तर
स्टील आणि सिमेंट हे बांधकामामध्ये वापरले जाणारे दोन मुख्य घटक आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सिमेंटच्या दरामध्ये 100 रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. स्टीलच्या किमतीही गगनाला भिडण्याच्या तयारीत आहेत. 45 हजार रुपये प्रति मेट्रिक टन या दराने मिळणारं स्टील सध्या 90 हजार रुपयांना मिळत आहे. म्हणजेच स्टीलच्या किमती दुपटीनं वाढल्या आहेत. याचा परिणाम हाउसिंग प्रोजेक्ट्सवर (Housing Projects) होत आहे.
PPF की ELSS? टॅक्स वाचवण्यासाठी आणि रिटर्न देण्याबाबत कोणती योजना चांगली, वाचा संपूर्ण माहिती
'क्रेडाई'च्या अंदाजानुसार, सध्या घरांच्या किमतींमध्ये 5 ते 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. येत्या काळात यामध्ये आणखी 5 ते 7 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. देशभरातल्या सर्व हाउसिंग प्रोजेक्ट्सवर महागाईचा परिणाम दिसत आहे. बांधकाम साहित्य महागल्यामुळे कामाची गती कमी झाली आहे, तर काही ठिकाणी बांधकामं ठप्प झाली आहेत. अशा परिस्थितीमध्ये बिल्डर्सनी (Builders) सरकारकडे महागाई कमी करण्याची विनंती केली आहे. कारण, महागाई कमी झाली नाही तर हाउसिंग प्रोजेक्ट्स अर्धवट राहण्याची किंवा बारगळण्याची भीती आहे. असं झाल्यास घर खरेदीस इच्छुक असलेल्या ग्राहकांवर याचा थेट परिणाम दिसेल.
बिल्डर्सच्या विनंतीवर शासन काय निर्णय घेणार, हे येत्या काळात स्पष्ट होईलच; पण तूर्तास तरी घराचं स्वप्न महागल्याचं निश्चित झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Home Loan, Investment, Money, Price hike