नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : आपल्या देशात शुभ मुहूर्तावर सोने (Gold) खरेदीची प्राचीन परंपरा आहे. शुभमुहूर्तावर खरेदी केलेले सोने किंवा अन्य मालमत्ता लाभदायी ठरते असा समज आहे. त्यामुळे नवीन खरेदी, गुंतवणूक शुभमुहूर्तावर केली जाते. त्यामुळे दिवाळीतही (Diwali) आवर्जून सोने किंवा अन्य ठिकाणी गुंतवणुक केली जाते. बहुतांश लोक सोने खरेदीलाच अधिक पसंती देतात. पण त्याचबरोबर दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शेअर बाजारातही (Share Market) मोठी उलाढाल होते. शेअर बाजारात खास मुहूर्ताचे व्यवहार होतात. त्यालाही गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळतो. या सगळ्या पर्यायांबरोबर सध्या आणखी एका पर्यायाची चर्चा आहे ती म्हणजे क्रिप्टोकरन्सीची (Crypto Currency).
यातील बिटकॉइन या लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीने गुंतवणूकदारांना प्रचंड नफा करून दिला आहे. त्यामुळे अनेक लोक त्याकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे दिवाळीत क्रिप्टोकरन्सी हा गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय ठरेल का? तो सोन्याशी स्पर्धा करू शकेल का? असा प्रश्न गुंतवणूकदारांकडून उपस्थित केला जात आहे. त्याबाबत तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊ या.
दिवाळीत क्रिप्टोकरन्सी हा गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय ठरेल का याबाबत वझीरएक्सचे (Wazirx) संस्थापक आणि सीईओ निश्चल शेट्टी, कॉईनस्वीच डॉट कोचे (CoinSwitch.co)संस्थापक आणि सीईओ शिष सिंघल, झेबपेचे (ZebPay)अविनाश शेखर यांनी आपली मते नोंदवली.
वाचा : दिवाळीत सोन्याची झळाळी वाढणार का? वाचा काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं
क्रिप्टोकरन्सीतील बिटकॉइन (Bitcoin) या प्रसिद्ध करन्सीने गेल्या दिवाळीपासून या दिवाळीपर्यंत 360 टक्के, इथरियमने 1,023 टक्के, पोल्काडॉटने 119 टक्के, लाइटकॉइनने 299 टक्के, रिपलने 361 टक्के, स्टेलरने 384 टक्के, कार्डानोने 2,005 टक्के आणि डोगेकॉइनने 10412 टक्के परतावा (Return) दिला आहे. हे लक्षात घेता गुंतवणूकीसाठी हा चांगला पर्याय ठरू शकेल. मात्र त्याबाबत अभ्यासपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे, असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कारण क्रिप्टो करन्सी हा डिजिटल मालमत्तेचा (Digital Asset) एक प्रकार आहे. हे एक आभासी चलन आहे. ते नोटा किंवा नाण्यांच्या स्वरूपात छापले जात नाही. अनेक देशांमध्ये याचा वापर केला जात असला तरी भारतात अद्याप याला इतकी मान्यता मिळालेली नाही. आधुनिक माहिती तंत्रज्ञानावर आधारीत याची यंत्रणा चालते. आपल्या देशात याला कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे त्यावर कोणतेही नियमन नाही. हा क्रिप्टोकरन्सीचा बाजार खूपच अस्थिर असतो. त्यात प्रचंड चढउतार होत असतात. त्यामुळे त्यात पैसे गमावण्याचा धोकाही अधिक असतो. त्यामुळे यामध्ये मोठ्या रकमेची गुंतवणूक करणे टाळावे. गुंतवणूकदारांना ज्यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्याबद्दल सखोल माहिती घेऊन मगच गुंतवणुकीबाबत निर्णय घ्यावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. भारतात क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करताना, त्याच्याशी संबंधित कर नियमही लक्षात घ्यावे असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
वाचा : HDFC Securities चा 'हा' मल्टीबॅगर स्टॉक खरेदीचा सल्ला, वर्षभरात दिले 110 टक्के रिटर्न्स
वझीरएक्सचे संस्थापक आणि सीईओ निश्चल शेट्टी यांच्या मते, क्रिप्टो मार्केटमध्ये 1 वर्षात 900 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्याचे ट्रेडिंग व्हॉल्यूम (Trading Volume) जवळजवळ 1000 टक्के वाढले आहे. क्रिप्टोच्या नियमनाबाबतच्या सकारात्मक बातम्यांनी याला पाठिंबा दिला आहे.जागतिक स्तरावर क्रिप्टोशी संबंधित अनेक सकारात्मक बातम्या आल्याने भारतातही त्याकडे कल वाढला आहे. जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी यात गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांचा त्यावरील विश्वास वाढला आहे. तथापि, नवीन बाजारपेठ असल्याने त्यात अस्थिरता अधिक आहे. त्याच्या नियमनाबाबत भारतातून आणि जगभरातून सकारात्मक बातम्या येत आहेत. तथापि, जागतिक स्तरावर त्याचे नियमन अद्याप पहिल्या टप्प्यात आहे. म्हणूनच क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. क्रिप्टोवर सरकारकडून नियमन असणे खूप महत्वाचे आहे. पण आपल्या देशात सरकारने याबाबत अद्याप गांभीर्याने विचार केलेला नाही. त्यामुळे देशातील क्रिप्टो एक्सचेंजेसनी एकत्रितपणे स्वयं-नियमन केले आहे. या पार्श्वभूमीवर क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी नीट माहिती घेऊन सावधपणे गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.
योग्य माहिती घेऊन अभ्यासपूर्वक गुंतवणूक केल्यास क्रिप्टोकरन्सी लाभदायी ठरू शकते. दिवाळीत हा पर्याय चांगला ठरू शकतो, पण याची सर्वस्वी जबाबदारी गुंतवणूकदाराची असेल. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.