नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : टाटा ग्रुपच्या (Tata Group) हेल्थकेयर यूनिट टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्सने (Tata Medical and Diagnostics) आता कोविड-19 टेस्ट किट (COVID-19 Test Kit)तयार केलं आहे. कंपनीकडून सोमवारी हे किट लाँच करण्यात आलं आहे. टाटाने तयार केलेले हे कोविड-19 टेस्ट किट्स डिसेंबर महिन्यात देशभरातील लॅबमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. सीईओ गिरिश कृष्णमूर्ति (Girish Krishnamurthy) यांनी न्यूज एजेन्सी रॉयटर्सला ही माहिती दिली आहे.
प्रत्येक महिन्याला तयार होणार 10 लाख टेस्ट किट्स -
सरकारकडून या टेस्ट किटला मंजुरी देण्यात आली आहे. हे टेस्ट किट तपासणीच्या 90 मिनिटांमध्ये रिझल्ट देईल, असं सांगण्यात आलं आहे. या कोविड-19 टेस्ट किट्सला चेन्नई येथील टाटा प्लांटमध्ये (Tata Plant, Chennai) तयार करण्यात येणार आहे. या प्लांटमध्ये दर महिन्याला 10 लाख टेस्ट किट्स तयार करण्याची क्षमता असल्याचं कृष्णमूर्ति यांनी सांगितलं.
सप्टेंबर महिन्यात हे स्वदेशी कोविड-19 टेस्ट किट विकसित करण्यात आलं होतं. याचं नाव 'फेलुदा' असं ठेवण्यात आलं आहे. याद्वारे कोरोना व्हायरस अचूक आणि स्वस्तात ओळखला जाऊ शकतो. या टेस्टने कोरोना व्हायरसचा रिपोर्ट दोन तासात येतो.
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने, टाटा CRISPR ला (clustered regularly interspaced short palindromic repeats) कोविड-19 चाचणी 'फेलुदा'च्या व्यावसायिक लाँचसाठी मंजुरी दिली आहे. या चाचणीमध्ये कोरोना व्हायरसच्या जीनोमची ओळख करण्यासाठी एका स्वदेशी रुपात विकसित, अत्याधुनिक CRISPR पद्धतीचा वापर केला गेला असल्याचं, CRISPR कडून सांगण्यात आलं आहे.
सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 85.5 लाखांवर पोहचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 1,26, 611 जण दगावले आहेत.