अमोलने बहिणीच्या लग्नात भेट देण्यासाठी मोठ्या हौसेने Flipkart वरुन टीव्ही ऑर्डर केला. मात्र, लग्नाच्या धामधूमीत तो चालू करायचा राहून गेला. जवळपास 15 दिवसांनी सर्व स्थिरस्थावर झाल्यानंतर बहिणीने टीव्ही जोडाला. पण, त्याचा अर्धा डिस्प्ले गेल्याचं लक्षात आलं. यासंदर्भात Flipkart कडे तक्रार केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. टrव्ही कंपनीने देखील हात वर केले. अखेर अमोलने प्रकरण हातात घेत ग्राहक न्यायालयाच्या मदतीने काहीही खर्च न करता कंपनीला चांगलाच धडा शिकवला. स्वतःच स्वतःची केस लढायच्या तयारीने कोर्टात पोहोचला आणि अमोलला बिलाची पूर्ण रक्कम 10 टक्के व्याजाने, मानसिक त्रासासाठी 5000 रूपये आणि तक्रार अर्ज खर्चासाठी 3000 हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली.
कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह... कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर आम्हाला सांगा.
सध्या प्लिपकार्ट, अमेझॉन सारख्या अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शॉपिंग केली जाते. तुम्हीही त्यापैकीच एक असाल तर कधीतरी तुम्हालाही असाच वाईट अनुभव आला असेल. किंवा भविष्यात येऊ शकतो. अशा स्थितीत आपण काय करावे? याची कायदेशीर माहिती असायला हवी. अमोलचा लढ्यातून तुम्हालाही याची माहिती होईल.
अमोल शैला सुरेश, (नाशिक) याने आपली बहीण कांचन हिच्या लग्नात भेट देण्यासाठी 16 जून 2021 रोजी Flipkart च्या (https://www.flipkart.com/) वेबसाईटवरून व्ही यू टेलिव्हीर्जन कॅलिफोर्निया या कंपनीचा Smart Android TV घेतला होता. यासाठी त्याने 23,748 रूपये ऑनलाईन पे केले होते. ऑर्डर केल्यानंतर तीन दिवसांनी 19 जूनला टिव्ही अमोलच्या नाशिकच्या घरी पोहच झाला. बॉक्स खोलून पाहीला असता बाहेरील बाजूस टिव्ही सुस्थितीत दिसत होता. टिव्ही ताब्यात दिल्यानंतर कंपनीचा माणूस घरी येऊन इंस्टॉल करेन. तुम्ही हात लावू नका, अशी सूचनाही देण्यात आली.
अमोलने कायदेशीर लढाई लढण्याचा मार्ग निवडला
घरी लग्न असल्याकारणाने अमोलने कंपनीच्या लोकांना काही दिवसांनी येण्यास विनंती के ली. मात्र, त्यानंतर कंपनीने कुठलाही संपर्क साधला नाही. शेवटी लग्नाचे घर स्थिरस्थावर झाल्यानंतर टिव्ही सेट चालू करून पाहिला असता टिव्हीच्या डिस्प्ले पॅनेलला पूर्णपणे तडा गेलेला आढळला. यावर कंपनीच्या ग्राहक सेवा टोल फ्री नंबरवर त्वरित कळवले. मात्र, कंपनीने तक्रार नोंदवून न घेता सुरुवातीला टाळाटाळ करणारी उत्तरे दिली. टिव्ही बदलून द्या किंवा पैसे परत करावे अशी विनंती केली. मात्र, कंपनीने दाद दिली नाही. न्यायालयात तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर साधारण दीड महिन्यानंतर कंपनीने 12 ऑक्टोबरला कंपनीने 50 टक्के रक्कम परत मिळेल असा मेल केला. अमोलने 1 हजार रुपये देऊन complete protection plan घेतला होता. त्याच प्लॅनमधून क्लेम मागितला. पण त्यातून 50% च रक्कम देत होते. काहीही चूक नसताना इतका मोठा भुर्दंड बसत असल्याने अखेर अमोलने कायदेशीर लढाई लढण्याचा मार्ग निवडला.
यासंदर्भात अमोलने सांगिलंत, की मी सर्वात आधी ग्राहक सेवा हेल्पलाईन पोर्टलवर (https://consumerhelpline.gov.in/) तीनवेळा तक्रार नोंदवली. यावर कंपनीने 'तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही, म्हणून आम्ही तुमची तक्रार बंद करत आहोत' असे खोटे कारण सांगून तक्रार बंद केली. यावर मी स्वतः कंपनीला 12 ऑक्टोबरला नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. त्यावरही कंपनीने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
शेवटी मी नाशिकच्या ग्राहक न्यायालयात गेलो. तिथं अर्ज नमुना पाहून कोणत्याही वकिलाची मदत न घेता स्वतः तक्रार दाखल केली. आठवड्याने माझी केस न्यायालयात दाखल करुन घेण्यात आली. पहिल्या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी मला विचारलं तुमचा वकील कोण आहे? त्यावर मी उत्तर दिलं की मी स्वतः माझी केस लढणार आहे. कायद्याचं ज्ञान आहे का? न्यायाधीशांनी विचारलं असता मी नाही म्हणून सांगितले. त्यावर त्यांनी कर्मचाऱ्याला सांगून एका महिला सरकारी वकीलाला बोलावून घेतलं. ह्या तुमची केस लढतील अशी मला माहिती दिली. शिवाय तुमच्या वकीलांकडून सगळं शिकून घे आणि अजून दहा लोकांना माहिती दे, असा सल्लाही न्यायाधीशांनी मला दिला.
अखेर न्याय मिळाला
कोर्टात केस दाखल झाल्यानंतर आठ तारखांमध्ये सुनावणी पार पडल्यानंतर माझ्या केसचा निकाल माझ्या बाजूने लागला. टिव्हीच्या बिलाची पूर्ण रक्कम 10 टक्के व्याजाने, मानसिक त्रासासाठी 5000 रूपये आणि तक्रार अर्ज खर्चासाठी 3000 हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली. वास्तविक, मला न्याय मिळण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागला. पण, मी समाधानी आहे. यासाठी मला सरकारी वकील अॅड. कोणीका टिळे-जाधव यांनी मोलाचं सहकार्य केलं.
असं घडल्यास तक्रार कशी दाखल करावी?
तुमची तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही 1800-11-4000 किंवा 14404 वर कॉल करू शकता. एसएमएस प्रमाणेच तुमची तक्रार येथे नोंदवली जाईल आणि त्याचे संभाव्य उपाय किंवा तुम्हाला पुढे काय करायचे आहे. ही माहिती दिली जाईल. तुम्ही http://consumerhelpline.gov.in/ पोर्टलवर तुमची नोंदणी करू शकता आणि तुमची तक्रार नोंदवू शकता. येथे तुम्ही तुमची तक्रार माहिती, कंपनीचे नाव आणि विवाद संबंधित कागदपत्रे देखील संलग्न करू शकता.
(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Consumer, Flipkart fraud, Kaydyache bola, Legal