Home /News /money /

1 जूनपासून सोन्याच्या खरेदी-विक्रीबाबतचा हा नियम बदलणार, तुमच्याकडे असणाऱ्या दागिन्यांवर होणार परिणाम?

1 जूनपासून सोन्याच्या खरेदी-विक्रीबाबतचा हा नियम बदलणार, तुमच्याकडे असणाऱ्या दागिन्यांवर होणार परिणाम?

देशात पुढील महिन्यापासून केवळ BIS हॉलमार्किंग असणाऱ्याच दागिन्यांची विक्री होणार आहे. CAIT ने त्यांच्या पत्रात असं म्हटलं आहे की सरकारचे पाऊल सकारात्मक आहे मात्र यामध्ये घाई केल्यास नुकसान सहन करावं लागू शकतं.

    नवी दिल्ली, 08 मे: देशात पुढील महिन्यापासून अर्थात 1 जूनपासून BIS चं हॉलमार्किंग (BIS hallmarking) असणाऱ्याच दागिन्यांची विक्री होणार आहे. ज्यामुळे सोनेखरेदीमध्ये होणारी फसवणूक कमी केली जाऊ शकते. हॉलमार्किंगचे नवीन नियम लागू होत असताना एक प्रश्न उपस्थित होतो आहे की, देशात जर केवळ हॉलमार्किंग असणाऱ्या दागिन्यांचीच विक्री होणार असेल तर आधी खरेदी करण्यात आलेल्या आणि ज्यावर हॉलमार्किंग नाही आहे अशा दागिन्यांचं काय होणार? कोरोना काळात अशाप्रकारे नियम लागू झाला तर यासंदर्भात सरकार तयारी कशा पद्धतीने करेल याबाबत थोडा संभ्रम आहे. मात्र नियम लागू झाल्यास सोन्याच्या खरेदी-विक्रीवर काय परिणाम होणार? नवीन हॉलमार्किंग असणारे दागिने खरेदी केल्यावर तुम्हाला फायदा होणार का? तुमच्या जुन्या दागिन्यांचं काय होणार? जाणून घ्या या सर्व प्रश्नांची उत्तरं. शुद्धतेची गॅरंटी वाढणार हॉलमार्क (Hall Mark) अनिवार्य झाल्यानंतर एक जूननंतर देशभरातील दागिन्यांच्या बाजारपेठेत केवळ हॉलमार्क असलेले 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातील. यामुळं ग्राहकांची फसवणूक टळेल. त्यांना शुद्ध सोन्याचे दागिने मिळतील. हॉलमार्किंगमध्ये BIS चं चिन्हं, कॅरेटबाबत माहिती, दागिना केव्हा बनला त्याचं वर्ष, सराफाचं नाव असेल. BIS हॉलमार्किंग आंतरराष्ट्रीय मापकांशी जोडण्यात आलं आहे. यामुळे सोने व्यापारात पारदर्शकता वाढेल जुन्या दागिन्यांचं काय होणार? तुमच्याकडे असणाऱ्या जुन्या दागिन्यांचं देखील तुम्ही हॉलमार्किंग करू शकता. तुम्ही कोणत्याही हॉलमार्किंग सेंटरवर जाऊन हे काम पूर्ण करू शकता. मात्र जुन्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी तुम्हाला थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतील. शिवाय हॉलमार्किंग नसणारे दागिने विकताना थोड्या समस्या देखील येऊ शकतात, कारण तुलनेने त्याचे पैसे काहीसे कमी मिळतील. फसवणूक केल्यास कारवाई सोन्याच्या शुद्धतेबाबत किंवा खरेदी-विक्री करताना कोणतीही फसवणूक केल्यास 1 लाखापर्यंत किंवा त्या दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड आकारला जाऊ शकतो. शिवाय 1 वर्षाचा तुरुंगवास देखील होऊ शकतो. तपासणीसाठी सरकारने BIS-Care असं App देखील लाँच केलं आहे. यामध्ये शुद्धता तपासण्याबरोबरच तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकता. याठिकाणी तुम्हाला हॉलमार्किंग संबंधातील तक्रारी नोंदवता येतील. CAIT ची डेडलाइन वाढवण्याची मागणी नोव्हेंबर 2019 मध्ये सरकारनं सोन्याचे दागिने आणि कलाकृतींसाठी 15 जानेवारी 2021 पासून हॉलमार्किंग अनिवार्य केलंजाईल, असं जाहीर केलं. मात्र कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) ही मुदत एक जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली. सरकारनं सराफ व्यावसायिकांना हॉलमार्किंगची तयारी करण्यासाठी आणि भारतीय मानक ब्युरोमध्ये (BIS) नोंदणी करण्यासाठी दीड वर्षापेक्षा अधिक वेळ दिला आहे. त्यामुळे ही मुदत आणखी वाढवण्यास सरकारनं स्पष्ट नकार दिला असून, लवकरात लवकर सराफ व्यावसायिकांनी भारतीय मानक ब्युरोमध्ये (BIS) नोंदणी करावी असं आवाहन केलं आहे. हे वाचा-आर्थिक फटका सहन करण्यासाठी तयार राहा! पेट्रोल 5 रुपये/लीटरने महागणार- रिपोर्ट पीयूष गोयल यांना पत्र लिहून CAIT ने याबाबत असणारी डेडलाइन वाढवण्याची मागणी केली आहे. त्यांच्यामते 1 जूनपासून हा नियम लागू झाल्यास व्यापाऱ्यांचं नुकसान होईल. CAIT च्या माहितीनुसार देशात आवश्यक तितके हॉलमार्किंग सेंटर नाही आहेत. त्यामुळे पुढील महिन्यापासून हा नियम लागू झाला तर अनेक छोट्या व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय बंद करावा लागेल. कोरोना काळात आवश्यक सेंटर्स नसल्याने धोकाही वाढेल. यावेळी CAIT ने पत्रात म्हटलं आहे की सरकारचं हे पाऊल सकारात्मक आहे पण घाईत निर्णय घेतल्यास नुकसान झेलावं लागेल. देशात सध्या 11 राज्यात हॉलमार्किंग सेंटरच नाही आहे. सरकारने BIS हॉलमार्किंग सेंटर उघडण्याचे आदेश द्यावेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold price, Money

    पुढील बातम्या