मुंबई, 13 नोव्हेंबर: बँक ऑफ बडोदानं आपल्या लाखो ग्राहकांना दिलासा देण्यासाठी गृहकर्ज स्वस्त केलं आहे. ग्राहकांना त्यांच्या कर्जावर सवलत दिली जात आहे. गृहकर्जाच्या दरावर 25 बेसिस पॉइंट्सची सूट उपलब्ध आहे. मात्र काही निवडक ग्राहकांनाच या सवलतीचा लाभ मिळत आहे. बँक ऑफ बडोदाचं गृहकर्ज सवलतीनंतर वार्षिक 8.25 टक्के पासून सुरू होत आहे. गृहकर्जाचा कमी केलेला दर 14 नोव्हेंबर 2022 पासून लागू होणार आहे.
बँक ऑफ बडोदा कडून ही एक विशेष गृहकर्ज ऑफर आहे, ज्यामध्ये काही निवडक ग्राहकांनाच सवलतीचा लाभ दिला जात आहे. बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, जे ग्राहक नवीन गृहकर्ज घेत आहेत त्यांना दरावर 25 बेस पॉइंट्सची सूट दिली जात आहे. तसेच जे ग्राहक आपले गृहकर्ज बँक ऑफ बडोदाला हस्तांतरित करतात त्यांना 25 बेस पॉइंट्सची सूट दिली जात आहे. बँक ऑफ बडोदाने आणखी एका अतिरिक्त सुविधेअंतर्गत गृहकर्जाचे प्रक्रिया शुल्क माफ केले आहे.
कोणाला फायदा होईल-
या नवीन सुविधेत बँक ऑफ बडोदानं एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, ग्राहकाला किती गृहकर्ज मिळेल, हे पूर्णपणे त्याच्या क्रेडिट प्रोफाइलवर अवलंबून असेल. बँक ऑफ बडोदानं एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की ते सध्या बाजारात सर्वात आकर्षक दरात गृहकर्ज प्रदान करत आहे. गृहकर्जावरील हा विशेष दर 31 डिसेंबर 2022 पर्यंत उपलब्ध राहील. तथापि, बँक ऑफ बडोदाच्या सध्याच्या ग्राहकांना गृहकर्जाच्या या विशेष दराचा लाभ मिळणार नाही. फक्त नवीन ग्राहक आणि कर्ज हस्तांतरित करणार्यांनाच दरात सवलत मिळेल.
हेही वाचा: महाराष्ट्रातील ‘या’ बँकाचा परवाना RBIनं केला रद्द, ग्राहकांच्या ठेवीचं काय होणार?
EMI किती कमी झाला-
आता आपण हे देखील जाणून घेऊया की गृहकर्ज सवलतीचा लाभ ग्राहकांना किती आणि कसा मिळेल. समजा तुम्हाला बँक ऑफ बडोदाकडून विशेष दराने 30 लाख रुपयांचं गृहकर्ज घ्यायचं असेल, तर तुमच्यासाठी त्याचा दर 8.25 टक्के असेल. कर्जाचा कालावधी 20 वर्षांचा असेल. अशा प्रकारे तुम्हाला दरमहा 25,562 रुपये EMI भरावा लागेल.
इतर सरकारी बँकांच्या खात्यांवर नजर टाकली तर त्यांची गृहकर्ज 8.5 टक्के दराने सुरू आहे. या दराने, जर एखाद्या ग्राहकाने 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलं तर त्याचा ईएमआय 26,035 रुपये असेल. अशाप्रकारे विशेष गृहकर्ज दरावर, ग्राहकांना दरमहा 473 रुपयांचा लाभ मिळेल. परंतु त्याची अट अशी आहे की जे नवीन गृहकर्ज घेतील किंवा ज्यांना कर्ज बँक ऑफ बडोदाकडे हस्तांतरित केले जाईल त्यांनाच विशेष दराचा लाभ मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Home Loan