वॉशिंग्टन, 28 फेब्रुवारी: कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अक्षरशः कोलमडल्या आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात चीनचा अपवाद वळगता जगातील सर्व देशांचा विकास दर शुन्याच्या खाली गेला होता. याचा जबरदस्त फटका जगातील अनेक देशांना बसला आहे. जगाची महासत्ता असणारी अमेरिकाही याला अपवाद ठरली नाही. भारतीय अर्थव्यवस्थेच्या तुलनेत 7 पट मोठ्या असणाऱ्या या अर्थव्यवस्थेवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.
एका रिपोर्टनुसार, अमेरिकेवर सध्या 29 ट्रिलियन डॉलरचं कर्ज आहे. हे कर्ज म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या तुलनेत दहा पट आहे. असं असताना अमेरिकेने भारताकडूनही 216 अब्ज डॉलरचं (15 लाख करोड) कर्ज घेतलं आहे. अमेरिकेच्या कर्जाचा विचार केला तर, प्रत्येक अमेरिकी नागरिकावर सध्या 84 हजार डॉलरचं म्हणजेच 60 लाख रुपयांपेक्षा अधिकचं कर्ज आहे.
अमेरिकन कॉंग्रेसमन अलेक्स मूनी म्हणाले की, अमेरिकेने चीन आणि जपानकडून सर्वात जास्त कर्ज घेतलं आहे. खरं तर हे देश अमेरिकेचे शत्रू आहेत. मूनी पुढे म्हणाले की, चीन हा अमेरिकेसाठी नेहमीच स्पर्धात्मक देश राहिला आहे. असं असताना अमेरिकेनं चीन आणि जपान या देशांकडून प्रत्येकी 1 ट्रिलियन डॉलर्सचं कर्ज घेतलं आहे. याशिवाय ब्राझील या देशाचाही अमेरिकेवर 258 अब्ज डॉलर्सचं कर्ज आहे. 2000 साली अमेरिकेवर 6 ट्रिलियन डॉलर्सचं कर्ज होतं, त्यानंतर ओबामा सरकारच्या काळात हे कर्ज दुप्पट झालं आहे. नंतरच्या काळात ते आणखी वाढत गेलं.
हे ही वाचा -खेळणी उद्योगात दडलेली ताकद ओळखून ती वाढवणं आवश्यक : पंतप्रधान मोदी
भारतावर आहे 147 लाख कोटींच कर्ज
सध्या भारतावर 147 लाख कोटींच कर्ज आहे. यामध्ये आता आणखी 12 लाख कोटींची भर पडणार आहे. कारण सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पानुसार 2021-22 या आर्थिक वर्षांत भारत आंतरराष्ट्रीय बाजारातून 12 लाख कोटी रुपयांचं कर्ज घेणार आहे. या नवीन कर्जानंतर भारतावरील एकूण कर्ज 159 लाख कोटी रुपयांच होईल. शिवाय चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 7.3 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठीही फारसा अनुकुल आहे, असं म्हणता येणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.