नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी लोकांना कमी खर्च आणि बचत जास्त करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी लोकांना रोख रकमेची बचत करण्यास सांगितले आहे आणि येत्या सुट्टीच्या हंगामात अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळावे, असेही ते म्हणाले आहेत. समोरील संभाव्य मंदीच्या पार्श्वभूमीवर कोट्यधीश जेफ बेझोस यांनी हा सल्ला दिला आहे.
CNN ला दिलेल्या मुलाखतीत बेझोस म्हणाले की, अमेरिकेतील लोकांनी आगामी काळात नवीन रेफ्रिजरेटर किंवा अगदी नवीन कार अशी कोणतीही मोठी खरेदी करू नये. मंदीच्या कठीण काळात हा पैसा कामी येईल.
बेझोस म्हणाले, “जर तुम्ही एकटे राहत असाल आणि तुम्ही मोठा स्क्रीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही थांबायला हवे. तुम्ही ते पैसे तुमच्याजवळच ठेवा. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जर लोकांनी असे केले तर पूर्वीपेक्षा कमी कमाई करणाऱ्या Amazon चा महसूल आणखी कमी होऊ शकतो.
चांगल्याची अपेक्षा करा अन् वाईटासाठी तयार रहा -
याव्यतिरिक्त, अॅमेझॉनचे माजी सीईओंनी सुचवले की, लहान व्यवसाय मालकांनी नवीन उपकरणांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी रोख रक्कम बचत करावी. ते म्हणाले, "शक्य तितकी कमी जोखीम घ्या... चांगल्याची आशा करा, परंतु सर्वात वाईटासाठीही तयारी करा."
आपली जास्त संपत्ती करणार दान -
जेफ बेझोस म्हणाले की, ते त्यांच्या 124 अब्ज डॉलर्सच्या निव्वळ संपत्तीपैकी बहुतेक दान त्यांच्या जीवनकाळात धर्मादाय संस्थांना देतील. आपल्या संपत्तीचा मोठा भाग हवामान बदलाशी लढण्यासाठी आणि खोल सामाजिक तसेच राजकीय विभाजनांना तोंड देत मानवतेला एकत्र आणू शकतील, अशा लोकांना पाठिंबा देण्यासाठी समर्पित करणार असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - ट्विटर अन् मेटापाठोपाठ आता अॅमेझॉनमध्येही होणार कर्मचारी कपात; सीईओंनी दिला दुजोरा
बेझोस सध्या अॅमेझॉनचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. गेल्या वर्षीपासून अँडी जस्सी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्याने ते या भूमिकेसाठी तयारी करत आहेत. ई-कॉमर्स दिग्गज Amazon ने ट्विटर, मेटा, लिफ्ट इत्यादी इतर तंत्रज्ञान कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. अॅमेझॉनसह अनेक कंपन्यांच्या मंद गतीने महसूल वाढीचा सामना करावा लागत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.