नवी दिल्ली, 13 एप्रिल : देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रामध्ये 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उर्वरित देशामध्ये देखील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. मात्र ज्यावेळी लॉकडाऊन संपेल त्यावेळी देशातील सर्वांनाच महागाईचा सामना करावा लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे विमानप्रवासाचे तिकीट महागण्याची शक्यता आहे. विमान कंपन्या सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत तीन सीट असणाऱ्या ठिकाणी एकाच व्यक्तीला बसवण्याच्या विचारात आहेत. परिणामी एका व्यक्तीला तिप्पट तिकीटदराचा भूर्दंड बसण्याची शक्यता आहे.
(हे वाचा-COVID-19 : 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, पगारात होणार 35 टक्के कपात)
लॉकडाऊन संपल्यानंतर विमानकंपन्या तीन पॅसेंजर्सच्या जागेवर एका पॅसेंजरला बसवून विमान उड्डाणसेवा सुरू करण्याच्या विचारात आहेत. याप्रकरा व्यवस्था केल्यास जर विमानामध्ये 180 लोकांना बसण्यासाठी जागा असेल, तर त्यामध्ये केवळ 60 पॅसेंजरच प्रवास करू शकतात. यामध्ये विमान कंपन्यांचं मोठं नुकसान आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी विमान कंपन्यांकडून 1.5 ते 3 पटींनी जास्त भाडं आकारालं जाऊ शकतं.
पॅसेंजर्समध्ये 1.5 मीटरचे अंतर असणार
डायरक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) लॉकडाऊन संपल्यानंतर नेमक्या काय उपाययोजना करायच्या यासंदर्भात विचार करत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा फ्लाइट्स सुरू होतील त्यावेळी सोशल डिस्टंसिंगकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. विमानतळावर 1.5 मीटरवरूनच चालण्यासाठी खूणा करण्यात येणार आहेत. विमानतळावर प्रवेश केल्यापासून ते बोर्डिंग गेटपर्यंत याच नियमांचे पालन करावे लागणार आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद यांसारख्या मुख्य विमानतळांवर हे नियम पाळण्यात कोणतीही समस्या येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारतीय विमान कंपन्यांची आर्थिक स्थिती गंभीर
लॉकडाऊननंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण बंद आहेत. परिणामी विमान कंपन्या डबघाईला पोहोचतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ इंडिगो (Indigo) एअरलाइनकडे काही रिझर्व्ह कॅश शिल्लक आहे. कोव्हिड-19 (COVID-19) चे संकट संपल्यानंतर कोणती एअरलाइन त्यांचं अस्तित्व टिकवण्यात यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
संपादन- जान्हवी भाटकर