विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी नाशिक, 22 फेब्रुवारी : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आपल्या मालाला हमीभावाची मागणी करत आहेत. मात्र, ती मागणी अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाला आहे. सध्याच्या स्थितीला कांद्याला कवडी मोल भाव मिळत आहे. अवघ्या सहा सात रुपये किलोने कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा झालेला खर्च देखील भरून निघणं अवघड झाल आहे. यामुळे संतप्त होत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने चक्क येत्या 6 मार्चला कांद्याला अग्निडाग देण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाची पत्रिकाही कृष्णा डोंगरे यांनी छापली आहे. येत्या 6 मार्च रोजी कांदा अग्निडाग समारंभ आयोजित केला आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रण दिले आहे. येवला तालुक्यातील नगरसूल जवळील मातुलठाण या गावी समारंभाचे ठिकाण आहे. त्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी आपल्याला काही देणेघेणे नाही का, असा प्रश्न उपस्थित करीत समस्त कांदा उत्पादकांचे दुःख व्यक्त केले आहे.
निमंत्रण पत्रिकेमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्वांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. कांद्याच्या अग्निडागच्या कार्यक्रमाला या आणि कांद्याला अग्निडाग देऊन टाका म्हणजे एकदाच सर्वच संपून जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. वारंवार तसा ते उल्लेख करतात. मग त्यांना तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा का कळवळा वाटत नाही. अनेक वेळा ते दिल्लीवारी करत आहेत. एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीवारी करा अशी प्रतिक्रिया शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी दिली आहे.
नाशिकच्या तरुणानं केली आधुनिक ड्रोनची निर्मिती, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा, Video
सदर कार्यक्रमाच्या जाहीर निमंत्रण पत्रिका छापल्या असून सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे काही वर्षापुर्वी याच कांदा प्रश्नावर कृष्णा डोंगरे यांनी कांद्याचे शेत जाळून टाकलं होते.

)







