मुंबई, 13 जुलै: सध्या शेअर बाजारात (Share Market) आयपीओची (Initial Public Offering IPO) चलती आहे. अनेक कंपन्या भांडवल उभारणीसाठी शेअर बाजारात उतरत असून या कंपन्या पहिल्यांदाच आपले शेअर्स गुंतवणूकदारांसाठी आयपीओ म्हणजेच इनिशअल पब्लिक ऑफरिंगच्या माध्यमातून खुले करत आहेत. त्यामुळं अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर्स कमी पैशात खरेदी करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळत आहे.
जुलैमध्ये तब्बल 11 कंपन्या आयपीओच्या माध्यामातून शेअर बाजारात प्रवेश करत आहेत. तब्बल 18 हजार कोटींचे हे आयपीओ आहेत. यात सर्वात मोठा आयपीओ झोमॅटोचा (Zomato) असून या आयपीओच्या माध्यमातून 9375 कोटी रुपयांचा फंड उभारण्याची कंपनीची योजना आहे. याशिवाय जीआर इन्फ्रा, क्लीन सायन्स अँड टेक्नोलॉजी, ग्लेनमार्क लाइफ सायन्सेज, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, विजया डायग्नोस्टिक सेंटर, नुवोको विस्टास कॉर्पोरेशन, आधार हाउसिंग फायनान्स, श्रीराम प्रॉपर्टीज, सेवन आयलँड्स शिपिंग आणि एमी ऑर्गेनिक्स यांचे आयपीओ या महिन्यात येणार आहेत. त्याचबरोबर भांडवल बाजार नियामक सेबीनं (SEBI) गुजरातमधील तत्त्व चिंतन फार्मा केमला (Tatva Chintan Pharma Chem) आयपीओ साठी मंजुरी दिली असून हा आयपीओ 16 जुलै रोजी खुला होणार आहे.
हे वाचा-उद्यापासून आहे बंपर कमाईची संधी, 14040 रुपयांची गुंतवणूक करून व्हाल मालामाल
कंपनी उभारणार 500 कोटी
तत्व चिंतन फार्मा आयपीओच्या माध्यमातून 500 कोटी रुपये जमा करणार आहे. या आयपीओमधील शेअरचा किंमतपट्टा 1073 ते 1083 रुपये असा निश्चित करण्यात आला आहे. 16 जुलै ते 20 जुलै या कालावधीत गुंतवणूकदार त्यात पैसे गुंतवू शकतात. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, कंपनीच्या डीआरएचपीमध्ये आयपीओची ऑफर फॉर सेल 225 कोटी रुपयांची होती, परंतु आता ती वाढवून 275 कोटी करण्यात आली आहे. बीएसई (BSE) अर्थात मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार एनएसई (NSE) या दोन्ही एक्सचेंजमध्ये कंपनीच्या शेअर्सची नोंदणी होणार आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि जेएम फायनान्शियल या आयपीओचे मुख्य व्यवस्थापक आहेत.
निधीचा वापर कशासाठी करणार?
या आयपीओद्वारे जमा झालेला पैसा कंपनी दहेज मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचा विस्तार करण्यासाठी आणि वडोदरा इथं असलेल्या आपल्या संशोधन आणि विकास केंद्राचा खर्च तसंच कंपनीच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी वापरणार आहे. आयपीओचा 50 टक्के हिस्सा क्यूआयबीसाठी, 35 टक्के हिस्सा रिटेलसाठी आणि 25 टक्के हिस्सा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.
हे वाचा-Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं
कंपनीचा व्यवसाय काय आहे?
वडोदरास्थित तत्त्व चिंतन ही रसायन क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी आहे. कंपनीची वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने जगभरातील तब्बल 25 देशांना निर्यात केली जातात. या देशांमध्ये अमेरिका, चीन, जर्मनी, जपान, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटन यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 2020मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी कंपनीनं 263.24 कोटी रुपयांचा महसूल आणि 37.79 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. त्या आधीच्या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा 20.54 कोटी रुपये तर महसूल 206.3 कोटी रुपये होता. जानेवारी 2020 पर्यंत कंपनीवर एकूण 83.17 कोटी रुपयांचे कर्ज बाकी आहे.
(डिस्क्लेमर: बाजारातील गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधीन आहे. पैसे गुंतवण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. https://lokmat.news18.com/वरून कोणालाही पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला जात नाही)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Savings and investments, Zomato