मुंबई, 19 जानेवारी : आता एका बँकेतून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर (Money transfer) करणे सोपे झाले आहे. PhonePe, Google Pay, Amazon Pay आणि इंटरनेट बँकिंग (Online transaction processing) सारख्या अनेक पेमेंट अॅप्सच्या उपस्थितीमुळे डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. अनेकवेळा बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करताना चुकून बँक खाते क्रमांक चुकीचा टाकला गेल्याने रक्कम चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होते. जर तुमच्यासोबत असे होत असेल तर तुम्ही काय करावे? चला तर मग जाणून घेऊया.
सर्वप्रथम याबाबत बँकेला कळवा
जर चुकून तुम्ही दुसर्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील तर प्रथम तुमच्या बँकेला फोन किंवा ईमेलद्वारे त्याबद्दल कळवा. लवकरात लवकर शाखा व्यवस्थापकाला भेटला तर उत्तम होईल. ज्या बँकेच्या खात्यात तुम्ही पैसे ट्रान्सफर केले आहेत तीच ही समस्या सोडवू शकते, हे लक्षात असुद्या. चुकून झालेल्या व्यवहाराबद्दल तुमच्या बँकेला तपशीलवार माहिती द्या. यामध्ये व्यवहाराची तारीख आणि वेळ, तुमचा खाते क्रमांक आणि चुकून पैसे हस्तांतरित केलेले खाते क्रमांक इत्यादींचा समावेश करा.
बँकेने लवकरात लवकर कारवाई करावी
बहुतेक प्रकरणांमध्ये चुकून ट्रान्सफर झालेली रक्कम प्राप्तकर्ता परत करण्यास तयार असतो. पण जर त्याने पैसे परत करण्यास नकार दिला तर तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकता. अशा प्रकरणांमध्ये तुमच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्याचाही तुम्हाला अधिकार आहे. बँकेकडे तक्रार नोंदवून तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले, तर तुमच्या बँकेला लवकरात लवकर कारवाई करावी लागेल. चुकीच्या खात्यातून योग्य खात्यात पैसे परत करण्याची व्यवस्था बँकेला करावी लागेल.
Paytm Share 990 रुपयांच्या नीचांकी पातळीवर; गुंतवणूकदारांना मोठा झटका!
पैसे परत मिळू शकतात
तुम्ही ज्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील तो खाते क्रमांकच चुकीचा असेल किंवा IFSC कोड चुकीचा असेल, तर पैसे आपोआप तुमच्या खात्यात येतील. पण, तसे नसल्यास तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन भेटा. शाखा व्यवस्थापकाला या चुकीच्या व्यवहाराबद्दल सांगा. कोणत्या बँक खात्यात पैसे गेले आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करा. चुकून दुसर्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असल्यास पैसे परत मिळण्यास जास्त वेळ लागू शकतो.
काही वेळा बँकांना अशी प्रकरणे निकाली काढण्यासाठी 2 महिन्यापर्यंत कालावधी लागू शकतो. तुमचे पैसे कोणाच्या खात्यात गेले आहे, हे तुम्ही बँकेतून जाणून घेऊ शकता. त्या शाखेशी बोलून तुम्ही रक्कम काढू शकता.
ऑनलाइन पेमेंट करताना या गोष्टी लक्षात ठेवा
- पैसे ट्रान्सफर करताना प्राप्तकर्त्याचा बँक खाते क्रमांक पुन्हा तपासा.
- घाईघाईने बँक खाते क्रमांक टाकताना चुकून एक अंक बदलल्यास तुमचे पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होऊ शकतात.
- पैसे पाठवण्यापूर्वी खाते लाभार्थी जोडा, जेणेकरून तुम्ही वारंवार हस्तांतरण करू शकता.
- पहिल्यांदाच दुसर्याच्या खात्यात पैसे पाठवताना सुरुवात कमी पैसे पाठवून करा, जेणेकरून पैसे चुकीच्या खात्यात गेले तर कमीत कमी नुकसान होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.