23 जणांना मिळाला 'ड्रीम जॉब', 9 तास झोपण्याचे मिळणार 1 लाख

23 जणांना मिळाला 'ड्रीम जॉब', 9 तास झोपण्याचे मिळणार 1 लाख

‘झोपण्याचे पैसे मिळाले तर मी खूप श्रीमंत होईन’ किंवा ‘माझा झोपायचा रेकॉर्ड कुणीच मोडू शकत नाही’ अशी अनेक वाक्य तुम्ही तुमच्या झोपाळू मित्रांकडून अनेकदा ऐकली असाल. अशाच ‘झोपाळूं’ना खरंच झोपण्यातून पैसे कमवण्याची संधी मिळाली आहे.

  • Share this:

बेंगळुरु, 15 फेब्रुवारी : ‘झोपण्याचे पैसे मिळाले तर मी खूप श्रीमंत होईन’ किंवा ‘माझा झोपायचा रेकॉर्ड कुणीच मोडू शकत नाही’ अशी अनेक वाक्य तुम्ही तुमच्या झोपाळू मित्रांकडून अनेकदा ऐकली असाल. अशाच ‘झोपाळूं’ना खरंच झोपण्यातून पैसे कमवण्याची संधी मिळाली आहे. कर्नाटकची (karnatak) ची राजधानी बंगळुरुमध्ये वेकफिट (Wakefit) या स्टार्टअपने 23 जणांना ही इंटर्नशीप देऊ केली आहे. या लकी इंटर्न्सना 100 रात्र 9 तास झोपण्याचे 1 लाख रुपये मिळणार आहेत. या स्टार्टअपकडून लकी ड्रॉ पद्धतीने 21 भारतीय आणि 2 विदेशी नागरिकांची निवड करण्यात आली आहे. या नोकरीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीने दिलेल्या गाद्यांवर 9 तास झोपायचं आहे. त्याचप्रकारे स्लीप ट्रॅकर आणि तज्ज्ञांबरोबर काउन्सीलिंग सेशनमध्येही या उमेदवारांना सहभागी व्हावं लागणार आहे.

या इंटर्नशीपमध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांना कंपनीला एक व्हिडीओ शूट करुन पाठवायचा होता, ज्यामध्ये त्यांना झोप का आवडते याबाबत स्पष्टीकरण द्यायचं होतं. कंपनीने या उमेदवारांसमोर जाहीर केलं आहे की, ‘तुम्ही फक्त झोपा, जेवढा वेळ आणि जितकं शांतपणे तुम्ही झोपू शकता तेवढं झोपा. तुम्ही फक्त आराम करा बाकी आमच्यावर सोडा.’

‘स्लीप इंटर्न्स’ नेमकं करणार काय?

निवडण्यात आलेल्या 23 इंटर्न्सना स्लीप ट्रॅकर देण्यात येणार आहे. या इंटर्न्सना कंपनीकडून देण्यात आलेल्या गाद्यांवर 100 दिवसांसाठी रात्रीचे 9 तास झोपावं लागणार आहे. घरामध्येच या इंटर्न्सना या गाद्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे आठवड्याचे सातही दिवस या इंटर्नना आपल्या घरामध्ये झोपावं लागेल. मुंबई, बेंगळुरु, नोएडा, आग्रा, पुणे, भोपाळमधून 21 भारतीयांची तर अमेरिका आणि स्लोवाकियामधून दोघांची निवड करण्यात आली आहे.

या नोकरीची सगळ्यात भन्नाट गोष्ट म्हणजे, सध्या सुरु असलेली नोकरी सोडण्याची या ‘स्लीप इंटर्न्स’ना आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे घरी राहुनच 1 लाख कमावण्याची ही संधी आहे. लिंक्डइन (Linkedin) वर देखील या नोकरीबाबत सर्वाधिक सर्च करण्यात आलं होतं. 26 नोव्हेंबर 2019 रोजी या नोकरीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. लाखो अर्जदारांनी पाठवलेल्या व्हिडीओनंतर या 23 जणांची निवड करण्यात आली होती. शेवटच्या फेरीमध्ये अभिनेता आणि लेखक शिवांकित सिंह परिहार, अभिनेता नवीन कौशिक, टीव्ही अँकर सायरस बरोचा आणि कॉमेडियन मल्लिका दुआ यांनी या उमेदवारांची निवड केली.

वेकफिट इनोव्हेशन प्रायवेट लिमिटेड या कंपनीने लोकांच्या झोपेच्या पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी ही "स्लीप इंटर्नशिप" सुरू केली आहे.त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार 'पायजमा' हा या इंटर्नसचा युनिफॉर्म असणार आहे. वेकफिटचे सहसंस्थापक चैतन्य रामालिंगगौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीप इंटर्नशिप लोकांमध्ये शांत झोप परत आणण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे.

First published: February 15, 2020, 5:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या