मुंबई, 30 ऑगस्ट : महाराष्ट्रात जून महिन्यामध्ये एक मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आणि राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर शिंदे गट आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन करत एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. तर भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान, योगगुरू रामदेव बाबा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. रामदेव बाबांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक - या भेटीनंतर रामदेव बाबा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरूष आहेत. तसेच शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत” या शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. आम्ही मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या राजधर्मासोबत ते आपल्या सनातन धर्म आणि ऋषीधर्माचेही प्रामाणिकपणे पालन करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंशी आमचे स्नेहसंबंध होते. शिंदे हे त्यांचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत. या राजधर्मासोबत सनातन धर्माच्या प्रतिष्ठेबाबत आम्ही संवाद केला. फार चांगलं वाटलं" असे रामदेव बाबा प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
As always, blessed to welcome and meet Shri @yogrishiramdev ji at my official residence in Mumbai.#Maharashtra #babaramdevji #BabaRamdev pic.twitter.com/a2HIEztZle
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 29, 2022
आधी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट - दरम्यान, याआधी काल सोमवारी रामदेव बाबा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटोही फडणवीसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.