यवतमाळ, 16 मे : या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा विद्यमान खासदार भावना गवळी यांनाच मैदानात उतरवलं. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी निवडणूक लढवली. त्यामुळे इथे शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी कडवी लढत होती.
4 वेळा खासदार
भावना गवळी या शिवसेनेच्या मोठ्या नेत्या आहेत आणि त्या चार वेळा खासदार राहिल्या आहेत. 2014 च्या निवडणुकीत भावना गवळी यांना 4 लाख 77 हजार 905 मतं मिळाली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या शिवाजीराव मोघेंचा पराभव केला होता.
या मतदारसंघात यवतमाळच्या 4 आणि वाशिमच्या 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातले यवतमाळ, पुसद, दिग्रस, राळेगाव आणि वाशिम जिल्ह्यातल्या वाशिम आणि कारंजा हे विधानसभा मतदारसंघ येतात.फेररचनेच्या आधी हा फक्त वाशिम मतदारसंघच होता. नंतर त्यात यवतमाळही जोडण्यात आला.
कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला
कधीकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1996 मध्ये मात्र ही जागा भाजपला मिळाली. आता शिवसेना या जागेवर हॅटट्रिक करण्याचा प्रयत्न करते आहे.यवतमाळ लोकसभा मतदारसंघात यवतमाळ, वाशिम, कारंजा, राळेगाव या जागांवर भाजपचा कब्जा आहे. दिग्रसमध्ये शिवसेना तर पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे.
पहिल्या टप्प्यात मतदान
यवतमाळ - वाशिममध्ये 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान झालं. विदर्भामध्ये वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा - गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या सगळ्याच जागांवर युती विरुद्ध आघाडी असा सामना रंगला होता.
अकोल्यामधून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही निवडणूक लढवली. त्यामुळे अकोल्याच्या जागेकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.
==============================================================================
SPECIAL REPORT : मराठा आरक्षणासाठी सरकार वापरणार का अखेरचं अस्त्र?