भामरागड, 08 जुलै : राज्यातील सर्वात दुर्गम भाग असलेल्या गडचिरोलीमधील भामरागड इथे हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अत्यंत दुर्गम भाग असलेल्या या गावात एका 9 महिन्यांच्या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी तब्बल 28 किलोमीटरची पायपीट करावी लागली. इतकच नाही तर प्रसूतीनंतर 5 दिवसांनी पुन्हा आपल्या गावी परतण्यासाठी तिला 28 किलोमीटरचं अंतर चालत पार करावं लागलं. ऊन, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि ओढ्यांना येणारा पूर अशा अनेक समस्यांचा सामना करत 9 महिन्यांचा गर्भ पोटात घेऊन रुग्णालयात पोहोचणाऱ्या या महिलेच्या हिंमतीला तोड नाही.
गडचिरोलीमधील भामरागड हा नक्षलग्रस्त आणि अतिशय दुर्गम भाग. तुर्रेमर्का गावात साधे रस्तेही नीट नाहीत. माळलेल्या पायवाटेवरून किंवा जंगलातून रस्ता काढत नागरिकांना रुग्णालयात जावं लागतं. अशा भागात राहणाऱ्या रोशनी पोदाडी या महिलेला 3 जुलैला प्रसूतीसाठी 28 किलोमीटरचा प्रवास करावा लागला होता. त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दोघांचीही प्रकृती स्थिर होती.रुग्णालयात प्रसूती झाल्यावर 5 दिवसांच्या उपचारानंतर आपल्या घरी जाण्यासाठी पुन्हा जंगलातून 18 किमीची पायपीट करावी लागली.
हे वाचा-...सगळे गारद ! संजय राऊतांनी शरद पवारांच्या मुलाखतीचा प्रोमो केला प्रसिद्ध,VIDEO
या महिलेसह शिशुला रुग्णवाहिकेनं लाहेरीपर्यंत पोहोचवलं मात्र पुढे रस्ता नसल्यानं 18 किलोमीटरचं अंतर पायी कापावं लागणार होता. त्यापैकी जवळपास 8 किलोमीटरचा भाग हा डोंगर आणि जंगलाचा होता. या महिलेनं मोठ्या हिंमतीनं संकटांचा सामना केला आणि पुन्हा आपल्या गावी नवजात बाळासह सुखरुप परतली. मात्र या घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त होता आहे.
गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील अनेक गावं आजही दुर्लक्षित आहेत. तिथल्या गावांमध्ये पक्के रस्ते नाहीत. शिवाय त्यांना कोणत्याही सुविधा मिळाव्यात किंवा रुग्णालयात जाण्यासाठी डोंगर-दऱ्या आणि जंगलातून वाट काढत 18 किलोमीटरचं अंतर पायी तुडवत यावं लागतं. पावसाळ्यात तर ओढ्यांना पूर आल्यानंतर अनेक गावांचा संपर्कही तुटतो अशा भागांमध्ये आजही सुविधांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.