तुषार रुपनवर, प्रतिनिधी
मुंबई, 24 डिसेंबर : विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन (Assembly Winter Session) सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या दरम्यान आज एक अनपेक्षित घटना घडली आहे. अधिवेशन सुरु असताना आज विधान भवनाच्या गेटजवळ एका महिलेने रॉकेल (Kerosene) ओतून आत्मदहन (Self-immolation) करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने घटनास्थळी असलेल्या महिला पोलिसांनी संबंधित महिलेला अडवले. महिलेने काही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी तिने नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या नव्या नियमांना कंटाळून आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
आत्महदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला या युवा स्वाभिमान पार्टीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष असून राजलक्ष्मी पिल्ले असं त्यांचं नाव आहे. पोलिसांनी त्यांना आत्मदहन करण्यापासून वाचवले. यावेळी त्यांनी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्यावर टीका केली. "स्वतःला सक्षम बोलणारे दीपक पांडेय सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे शेवटी हतबल ठरले आहेत", अशी टीका त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा : रामदास कदम विधानभवन परिसरात भडकले, वैभव खेडेकरांवर गंभीर आरोप
"शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांचे पुतणे सराईत गुन्हेगार अजय बागुल हे सत्ताधारी पक्षात आहेत. त्यामुळे त्यांना नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांकडून वारंवार करण्यात आलेला बचावामुळे आपण हा टोकाचा निर्णय घेतला", असं राजलक्ष्मी पिल्ले यांनी सांगितलं.
राजलक्ष्मी यांचे नेमके आरोप काय?
काही आरोपींनी पिल्ले दाम्पत्यांची गाडी अडवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तरी पोलिसांकडून फक्त प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, असा दावा राजलक्ष्मी यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी सराईत गुन्हेगार अजय बागुल आणि त्याच्या साथीदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास पोलीस प्रशासन हतबल असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. मोक्कांतर्गत अडकलेला सराईत गुन्हेगार अजय बागुल यांच्यावर कारवाई करण्यास नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय असक्षम आहेत, असं देखील त्या म्हणाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.