शिवसेना रुग्णवाहिकेच्या चालकाला लुटणाऱ्या महिलेचा 'प्रताप' ऐकून पोलिसही थक्क

शिवसेना रुग्णवाहिकेच्या चालकाला लुटणाऱ्या महिलेचा 'प्रताप' ऐकून पोलिसही थक्क

विशेष म्हणजे शिवसेना शाखेत येवून महिलेनं जवळपास कुठे बाथरूम आहे का, अशी विचारणा केली होती.

  • Share this:

मुंबई, 7 नोव्हेंबर: गोरेगाव (Goregaon, Mumbai) येथील शिवसेना (Shiv Sena) शाखेमार्फत कोविड-19 रुग्णवाहिका (Covid 19 Ambulance) सेवा देण्यात येते. मात्र, एका रुग्णवाहिकेच्या चालकाला 3 दिवसांपूर्वी एका महिलेने आपल्या साथीदारांच्या मदतीनं लुटलं होतं.

विशेष म्हणजे शिवसेना शाखेत येवून महिलेनं जवळपास कुठे बाथरूम आहे का, अशी विचारणा केली होती. पोलिसांना याप्रकरणी कारवाई करत आरोपी महिलेसह तिच्या तीन साथीदारांना जेरबंद केलं आहे.

हेही वाचा...शरद पवारांचं बारामती हादरलं! मंदिराच्या गाभाऱ्यात तरूणाची आत्महत्या

काय आहे प्रकरण?

मिळालेली माहिती अशी की, गोरेगाव येथील शिवसेना शाखेत आरोपी महिला आली होती. जवळपास कुठे बाथरूम आहे का, अशी विचारणा तिनं केली होती. यावेळी शाखेत रुग्णवाहिका चालक बसला होता. तो महिलेला बाथरूम दाखवण्यासाठी पुढे आला असता महिलेसोबत आलेल्या 3 साथीदारांनी चालकाला बेदम मारहाण करत त्याला लुटलं होतं. त्याच्या जवळील पैसे घेऊन आरोपी पसार झाले होते.

याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर आधी चालक असलेल्या एका व्यक्तीची माहिती मिळाली. त्याची चौकशी केली असता घटनेच्या वेळेस तो चालक घटनास्थळी होता. तोच त्या महिलेला तिथे घेऊन आला होता. या चालकाने रुग्णवाहिकेवर काम केल्याने त्याला रुग्णवाहिकेची किती कमाई होते व चालक कधी ती रक्कम शाखेत जमा करतो, हे त्याला माहित होते. बरोबर तीच वेळ साधून महिलेच्या मदतीनं आधीच्या चालकानं विद्यमान चालकाला लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेमुळे मुंबई पोलिसही चक्रावले आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत परिवहनमंत्री अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईतील शिवसेनेच्या विभागांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या. एकता मंच तसेच 'चैतन्य ओंकार ट्रस्ट' यांच्या सहकार्याने 13 रुग्णवाहिकांचे, तर जाणीव ट्रस्ट तर्फे 12 रुग्णवाहिकांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.

शिवसेनेच्या पिढ्यांप्रमाणेच रुग्णवाहिका देखील अद्ययावत झाल्या आहेत. रुग्णवाहिका आणि शिवसेना हे नाते जुने असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कौतुक करताना सांगितलं होतं.

शिवसैनिकांची ओळख म्हणजे कुठल्याही संकटाला झोकून जायचं आणि रुग्णवाहिका सेवा देणं हे शिवसेनेचं काम आहे. या रुग्णवाहिका अत्याधुनिक आहेत. या रुग्णवाहिकेत कोव्हिड-19 रुग्ण नेत असला, तरी त्यातून कोव्हिड-19 होणार नाही, अशी काळजी घेतली गेली आहे, असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा...सासऱ्यांनंतर सूनबाईही राष्ट्रवादीच्या वाटेवर? बड्या नेत्याकडून रक्षाताईंचं कौतुक

राज्यासह मुंबईत झालेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांची लागणारी गरज ओळखत त्या उपलब्ध करुन देण्यात आल्या. कोरोनासारख्या आजारात शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळेच या सर्व रुग्णवाहिका ऑक्सिजन सुविधेने सुसज्ज असून यात नवीन तंत्रज्ञानच्या स्ट्रेचरचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली होती.

Published by: Sandip Parolekar
First published: November 7, 2020, 7:42 PM IST

ताज्या बातम्या