मुंबई, 16 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात रोजच नवीन वळणं येत असल्याचं दिसत आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे 20 तारखेला एकाच व्यासपीठावर येणार आहेत, त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीची युती होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या. एकीकडे या चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचूक टायमिंग साधलं आहे. एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे.
प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यामध्ये नवा ट्विस्ट येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला, पण प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आम्ही भाजपसोबत जाणार नाही, तसंच जे भाजपसोबत असतील त्यांच्यासोबतही आम्ही जाणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. इंदू मिलच्या स्मारकावरून माझ्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
महाविकासआघाडीची चर्चा थांबली
दरम्यान महाविकासआघाडीची चर्चा थांबली असल्याचं सांगताना प्रकाश आंबेडकर यांनी कारणही सांगितलं. महाविकासआघाडी सरकार असताना काही घटकांची माझ्याशी चर्चा झाली. तेव्हा महाविकासआघाडी एकत्र राहणार असेल, तर वंचित बहुजन आघाडीचा त्यात कसा समावेश होईल, याचा आराखडा तयार केला आहे का? नाना पटोले स्वतंत्र लढणार असल्याचं बोलत होते, त्यामुळे महाविकासआघाडी म्हणून तुम्ही वंचित बहुजन आघाडीशी स्वतंत्र बोलणार आहात का? असं मी त्यांना विचारलं, या प्रश्नाचं उत्तर अजूनही येत आहे, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. महाविकासआघाडीचं त्यांचा काही ठरत नाही, तोपर्यंत राजकीय चर्चेचं पुढे काही होईल, असं मला दिसत नाही, असं आंबेडकर म्हणाले.
ठाकरे-आंबेडकर एकाच मंचावर
'प्रबोधनकार ठाकरेंच्या पोर्टल उद्घाटनाचा कार्यक्रम 20 तारखेला आहे. हा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वी होता. प्रबोधनकार आणि बाबासाहेबांचा संबंध जवळचा होता, त्यामुळे त्यांनी मला बोलावलं, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Prakash ambedkar