मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरुन विजय वडेट्टीवारांचा इशारा

...तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरुन विजय वडेट्टीवारांचा इशारा

विजय वडेट्टीवार फाईल फोटो

विजय वडेट्टीवार फाईल फोटो

राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर नवीन सरकारने मविआ सरकारच्या अनेक निर्णयात बदल केला आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरुन राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारची 12 आमदारांची यादी रद्द केल्यास, महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात जाणार, असा इशारा काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भात एक पत्र पाठवले आहे. या पत्रानंतर विजय वडेट्टीवार यांनी हा इशारा दिला.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार -

राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर नवीन सरकारने मविआ सरकारच्या अनेक निर्णयात बदल केला आहे. आता शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेली 12 राज्यपाल नामनिर्देशित यादी रद्द करण्यासंदर्भात पत्र दिलं आहे. तर दुसरीकडे ही यादी रद्द केल्यास महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात जाईल, असा इशारा विजय वड्डेटीवार यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्रावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यपालांना मर्यादित अधिकार आहेत. राज्यपालांना दिलेली यादी ही कॅबिनेटच्या मंजूरी नंतर पाठवली जाते. एकदा यादी दिल्यानंतर कारण देऊन फेटाळावी लागते. मात्र, ती यादी अद्यापपर्यंत राज्यपालांनी फेटाळली नाही. याचा अर्थ ती यादी राज्यपालांच्या अजुनही विचाराधीन आहे. जर ही यादी रद्द केली तर आम्ही न्यायालयात दाद मागू, असेही ते म्हणाले. आमची यादी का रद्द केली? या संदर्भात आम्हाला सर्वोच्च न्यायालयात लढावं लागेल. सरकारच्या संवैधानिक बाबींवर अजुनही प्रश्नचिन्ह आहे. महागाई विरोधात दिल्लीत रॅलीला आलो आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रात काय -

मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवलं आहे. यात त्यांनी विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाठवलेली यादी मागे घेण्याची विनंती केली आहे. शिंदे गट आणि भाजपकडून राज्यपालांना याजागी नवी यादी दिली जाणार आहे. ‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यपालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही मागणी मान्य करुन ती यादी मागेही घेतली आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडीतील पक्षांसाठी धक्का मानला जात आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; राज्यपालांना पत्र पाठवत केली ही मागणी

दरम्यान, काँग्रेसचे मंत्री शपथ घेणार यावर ते म्हणाले की, याबाबत अशोक चव्हाण साहेबांनी यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. यात तथ्य नाही. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत ते म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली भूमिका माध्यमांवर मांडण्यापेक्षा पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर मांडणं गरजेचं आहे.

नुकताच गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीमामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, सर्वच दिवस सुगीचे नसतात. सुख मे सब साथी दुख मे नही कोई, अशी काँग्रेस पक्षाची सध्या स्थिती आहे. हे दिवस जातील. चलते रहो.. मंजील तक पहुचोगे.. अगर रुकोगे तो ना मंजील का पता होगा ना खुदा का पता होगा, अशा शायराना अंदाजमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली.

First published:

Tags: Vijay wadettiwar