पंढरपूर-मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पराभूत का झाले? निकालाचे अचूक विश्लेषण फक्त न्यूज18 लोकमतवर

पंढरपूर-मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पराभूत का झाले? निकालाचे अचूक विश्लेषण फक्त न्यूज18 लोकमतवर

भालके हे विठ्ठल साखर कारखाना अडचणीत असल्याने आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी बनून गेले आहे. गेली निवडणूकच भारत भालकेंनी उसणवारीवर लढली होती.

  • Share this:

पुणे, 2 मे : पंढरपूर - मंगळवेढा हा मतदारसंघ खरंतर राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेला परिसर पण यावेळी तिथे मंगळवेढ्याचा आवताडे गट आणि पंढरपूरचा परिचारक गट पहिल्यांदाच एकत्र आल्याने भालके गटाचा निभाव लागला नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातील या मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचा विजयी झाला. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे तीन हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत.

खरंतर गेल्या दोन निवडणुकीत या दोन गटांमधील मतविभागणीमुळेच भारत भालके सलग तिसऱ्यांदा आमदार होऊ शकले होते. पण कोरोनामुळे आ. भारत भालके यांचं अकाली निधन झालं आणि तिथे पोटनिवडणूक लागली. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्याच ताब्यात ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तिथं चार दिवस तळ ठोकला होता. पण परिचारक गटाने आवताडे गटाची साथ दिल्याने भाजपचा विजय सुकर बनला.

राज्यात विधानसभा मतदारसंघ फेररचना झाल्यापासून मंगळवेढ्यातील जनतेला त्यांच्या तालुक्याचा आमदार मिळत नव्हता. तो देखील एक फँक्टर यावेळी आवताडेंना विजयी करण्यात ठरला तसंच पंढरपुरातून परिचारक गटाने प्रामाणिकपणे आपली सगळी ताकद फडणवीसांच्या आदेशावरून आवताडें मागे उभी केली. यात त्यांचा स्वत:चा असा फायदा आहे की, यापुढे भालके गटाचं राजकारण संपुष्टात येऊन पंढरपूर नगरपालिका पुन्हा परिचारक गटाकडे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे ही वाचा-अखेर राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम झालाच! पंढरपुरात समाधान आवताडे विजयी

तसंच समाधान आवताडे हे गडकरींनी पुढे आणलेले युवा कंत्राटदार आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांची आर्थिक बाजू भरभक्कम होती. भालके हे विठ्ठल साखर कारखाना अडचणीत असल्याने आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी बनून गेले आहे. गेली निवडणूकच भारत भालकेंनी उसणवारीवर लढली होती. तसंच पहिल्या निवडणुकीत मंगळवेढ्यातील ज्या 34 गावांच्या पाणी प्रश्नांवर भालकेंनी मोहिते पाटलांनाही धोबीपछाड दिला होता. तो प्रश्न अजूनही पूर्णपणे मार्गी लागलेला नाही. अशातच ऊस उत्पादकांची थकबाकी, वीजबील सक्ती, भालकेंविरोधात नाराजी होती. भालकेंच्या मुलाऐवजी त्यांच्या पत्नी उभारल्या असत्या तर नक्कीच सहानुभूती मिळू शकली असती. पण मुलगा हट्टाला पेटल्याने राष्ट्रवादीचा नाईलाज झाला आणि पराभवाचा 'पंढरपुरी बुक्का' कपाळी लागलाच.

Published by: Meenal Gangurde
First published: May 2, 2021, 7:59 PM IST

ताज्या बातम्या