सोलापूर, 30 मे : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा केली. राज्यातील शहरांमधील रुग्णसंख्या कमी होत असली तरी दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे रुग्णसंख्येवरुन दिसत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आपण सर्वांनी मिळून गावं वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री उद्धधव ठाकरे यांनी सांगितले. असे असले तरी अनेक गावांमध्ये रुग्णसंख्येवर नियंत्रण आणणे शक्य झाले आहे. यावेळी त्यांनी 21 वर्षीय ऋतुराज देशमुख यांचं कौतुक केलं. ऋतुराज याच्या पुढाकारामुळे त्या गावातील कोरोनाच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणणे शक्य झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, हिवरे बाजार सारखा प्रयत्न राज्यातील काही सरपंच व गावे करीत आहेत. मी त्यांचेही कौतुक करतो. पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख, कोमल ताई यांच्यासारखे सरपंच एक उदाहरण घालून देत आहेत. मी त्यांच्याशी बोलतो आहे, असेही ते यावेळी म्हणाले. आज कोविडला रोखण्यात जसे वैद्यकीय उपचारांचे महत्व आहे तसेच लोकांची जागृती आणि सहभागही फार महत्वाचा आहे. सरकार एकट्यानेच हा लढा लढू शकत नाही. हिवरे बाजार सारखे शिस्तबद्ध रीतीने रोगाचा मुकाबला केल्यास आपल्यालाही कोविडशून्य गाव करता येऊ शकेलं. आणि म्हणूनच हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील गावांनी नियोजन करावे असे आवाहन मी करतो. राज्य शासन या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करेल. हे ही वाचा- लॉकडाऊन वाढवला; काही जिल्ह्यात नियमात बदल, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 10 मुद्दे कोण आहे ऋतुराज देशमुख? सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या घाटणे येथील 21 वर्षाचा तरुण ऋतुराज रवींद्र देशमुख (Ruturaj Deshmukh) यांनी विजय मिळवत सर्वांत तरुण सरपंच होण्याचा मान पटकवला आहे. तर राजश्री शाहजी कोळेकर ही तरुणी वयाच्या 23 व्या वर्षी घाटणे गावाची उपसरपंच झाली आहे. ऋतुराज आणि राजश्री यांच्या निवडीमुळे घाटणे गावची सत्ता तरुणाईच्या हातात गेली आहे. ऋतुराज सध्या 21 वर्षाचा असून नुकतंच त्याचं बीएससीचं शिक्षण पूर्ण झालं आहे. नंतर आता तो LLB ला प्रवेश घेणार आहे. निवडणुकीच्या काळात ऋतुराजनं तयार केलेला वचननामा चर्चेचा विषय ठरला होता. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतःचा वचननामा तयार करून गावच्या विकासाचा रोडमॅप सांगणारा ऋतुराज पहिलाच असावा. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लोकनेते बाबुराव अण्णा पाटील ग्रामसमृद्धी पॅनलकडून त्यानं निवडणूक लढवली होती. ऋतुराजनं ग्रामसमृद्धी पॅनेलअंतर्गत 7 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 5 जण विजयी झाले होते. आता सरपंच पदाची निवडणुकदेखील ऋतुराजनं जिंकली आहे. त्यामुळे ऋतुराज हा सर्वाधिक तरुण वयाचा सरपंच ठरला आहे. कसं केलं गाव कोरोनामुक्त नव्या मोहिमेअंतर्गत त्यांनी पुढील पंचसुत्रीचा वापर केला. -गावातील नागरिकांच्या अँटीजन टेस्ट केल्या. -आशासेविकांच्या मदतीनं गावात घरोघरी जाऊन नागरिकांचे तापमान आणि ऑक्सिजनची पातळी तपासली. - प्रत्येक कुटुंबाला कोरोना सेफ्टी किट दिली. त्यात मास्क, सॅनिटायझर, साबण यांचा समावेश. - बाहेर गावातून येणाऱ्या व्यक्तीसाठी सक्तीचं 3 दिवसांचं क्वारंटाईन. - गावातील 45 वर्ष वयावरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प आयोजित केला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.