मुंबई, 9 नोव्हेंबर : 100 दिवस आर्थर रोड जेलमध्ये राहिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत थोड्याच वेळात बाहेर येणार आहे. पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांना जामिन मंजूर केला. पीएमएलए कोर्टाच्या या निर्णयाविरोधात ईडीने हायकोर्टात धाव घेतली, पण तिकडेही संजय राऊत यांना दिलासा मिळाला, त्यामुळे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संजय राऊत जेलमधून बाहेर येणार आहेत.
संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. आर्थर रोड जेलबाहेर शिवसैनिकांची गर्दी व्हायला सुरूवात झाली आहे.
आर्थर रोड जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत हे पहिले सिद्धीविनायक मंदिरात जाणार आहेत. यानंतर ते शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करणार आहेत. शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी जाणार आहेत.
कोर्टाने ईडीला झापलं
दरम्यान संजय राऊत यांना जामीन देताना पीएमएलए कोर्टाने ईडीला झापलं आहे. संजय राऊत आणि प्रविण राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचं परखड मत न्यायालयाने मांडलं आहे. ईडीने आपल्या मर्जीतील आरोपी निवडले. मुख्य आरोपी असलेल्या राकेश सारंग, एचडीआयएल, म्हाडा आणि सरकारी अधिकाऱ्यांना ईडीने अटक केली नाही, असंही कोर्टाने त्यांच्या कॉपीमध्ये म्हणलं आहे. ईडीने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, असे खडे बोल कोर्टाने सुनावले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjay raut