निर्दयी जन्मदात्यांनी 7 दिवसांच्या तान्हुलीला रेल्वे स्टेशनवरच सोडलं; विद्यार्थी ठरले देवदूत

निर्दयी जन्मदात्यांनी 7 दिवसांच्या तान्हुलीला रेल्वे स्टेशनवरच सोडलं; विद्यार्थी ठरले देवदूत

अवघ्या 7 दिवसांच्या तान्हुलीला माता-पित्याने रेल्वे स्थानकावर सोडून देवून तिथून पोबारा केला. (National Girl Child Day) राष्ट्रीय कन्या दिवसालाच ही धक्कादायक घटना उघड झाली.

  • Share this:

लासलगाव (नाशिक), 24 जानेवारी : अवघ्या 7 दिवसांच्या बाळाला जन्मदात्यांनी बेवारसपणे लासलगावच्या रेल्वे स्थानकावर सोडून दिलं होतं. या बाळाचा निरागस चेहरा बघून संवेदनशील माणसाचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत, पण जन्मदात्यांनी मात्र या गोंडस तान्हुलीला निर्दयीपणे तसंच सोडून दिलेलं होतं.  नंदिग्राम एक्स्प्रेसने नेहमी प्रवास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना रडण्याचा आवाज आला म्हणून त्यांनी पाहिलं तर ही गोंडस तान्हुली त्यांना आई-वडिलांशिवाय एकटीच दिसली. या विद्यार्थ्यांनी आसपास बराच शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण आई-वडिलांचा पत्ता लागला नाही. शेवटी या इवल्याशा जिवाला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आणि तिथून शासकीय रुग्णालयात.

या धक्कादायक घटनेची संपूर्ण लासलगावात चर्चा सुरू आहे.  7 दिनसांच्या इवल्याशा जीवाला असं रस्त्यावर बेवारस सोडताना 9 महिने बाळाला आपल्या पोटात वाढवणाऱ्या मातेला आणि या तान्हुलीच्या पित्याचं काळीज कसं हाललं नाही. आपल्या कोवळ्या निरागस जीवाला असं रेल्वे स्थानकावर सोडून देताना काहीच कसं वाटलं नाही याची चर्चा सुरू होती. त्याच वेळी विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या सजगपणाचं कौतुकही झालं.

अजूनही 'ती' नकोशीच

2020 साल उजाडलं पण तरी अजूनही मुलगी नकोशी असलेली मानसिकता कमी होताना दिसत नाही. देशभरातील जवळपास सर्व राज्यांमध्ये बेटी बचाव बेटी पढाव याविषयी सरकारमार्फत जनजागृती होत आहे. मात्र अजूनही तिच्या जीवाला नख लावणं सुरूच आहे. लालसगावच्या रेल्वे स्थानकावर सोडलेली ही चिमुकलीही नकोशी झाली होती का याचा पत्ता अद्याप पोलिसांना लागलेला नाही.  त्यांनी बाळाच्या आईवडीलांचा शोध घेतला कुणीच आढळेलं नाही. विद्यार्थ्यांनी या चिमुकलीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि मग घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत त्या बाळाला ताब्यात घेतलं आणि तिला शासकीय रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी तान्हुलीला तपासल्यावर तीची प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं. रुग्णालयात उपचार केल्यानंतर आता या बाळाला नाशिकच्या बाल शिशुगृहात दाखल करण्यात आलं आहे.

निर्दयी माता-पित्यांविरोधात गुन्हा दाखल

लासलगावात ज्या निष्ठूर आई-वडीलांनी निष्पाप जीवाला सोडून दिलं त्याच्यांविराधात रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून त्या निर्दयी माता-पित्याचा शोधही सुरू आहे. कोण, कसं कधी सोडून गेलं याचा तपास पोलीस करत आहेत. त्यामागे कारण काय आहे याचाही शोध घेतला जाईल. पण अजूनही मुली मुलांपेक्षा कमी नाहीत हे अनेकदा ती सिद्ध होऊनही सडलेल्या विचारांची माणसं आणि समाज असं तान्हुलीला सोडून देत आहे. आपल्या कर्तृत्वाने जन्मदात्यांसोबतच संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असं कार्य करणाऱ्या यशस्वी महिला आज कितीतरी आहेत. तरीही अशा घटना पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात घडत आहेत.

First published: January 24, 2020, 4:55 PM IST

ताज्या बातम्या