Home /News /maharashtra /

खेडमधील जगबुडी नदीत आणखी एका मगरीचा मृत्यू, दोन वर्षातील चौथी घटना; कारण अस्पष्ट

खेडमधील जगबुडी नदीत आणखी एका मगरीचा मृत्यू, दोन वर्षातील चौथी घटना; कारण अस्पष्ट

जगबुडी नदीमध्ये आज सकाळी एक महाकाय मगर मृतावस्थेत (Crocodile Dies in Jagbudi River) आढळली. दोन वर्षात चार लहान मोठ्या मगरींचा मृत्यू या नदीत झाला आहे.

रत्नागिरी 22 मार्च : जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीमध्ये आज सकाळी एक महाकाय मगर मृतावस्थेत (Crocodile Dies in Jagbudi River) आढळली. खेड आणि भोस्तेदरम्यान गणेशघाट परिसरात ही महाकाय मगर मृतावस्थेत आढळली आहे. जगबुडी नदीमध्ये मगरींच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत असून गेल्या दोन वर्षात चार लहान मोठ्या मगरींचा मृत्यू या नदीत झाला आहे. खेडमधील बारामाही वाहणाऱ्या या जगबुडी नदीत शेकडो महाकाय मगरींचे वास्तव्य आहे, म्हणून याठिकाणी क्रोकोडाईल पार्क व्हावे असा प्रस्ताव गेल्याच महिन्यात शासन दरबारी आमदार योगेश कदम यांनी सादर केला. मात्र, याच नदीतील महाकाय मगरींचे होणारे मृत्यू चिंतेचा विषय बनला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठी नदी असणाऱ्या जगबुडी नदीमध्ये शेकडो मगरींचे वास्तव्य आहे. खेड शहारानजीक वाहणाऱ्या या नदीमध्ये ८ ते १० फुटांच्या लांबच्या लांब मगरी वास्तव्याला आहेत. सकाळी , दुपारी आणि संध्याकाळी या मगरी खुलेआम नागरिकांना दर्शन देतात. तर काही काठावर विश्रांती घेत असताना पाहायला मिळतात. दापोली, खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी गेल्याच महिन्यात प्रस्ताव दाखल केला आहे. यात या परिसराला क्रोकोडाईल पार्क म्हणून दर्जा मिळावा, जेणेकरून पर्यटनाच्या दृष्टीने या भागाचा विकास होईल तसंच संपूर्ण राज्यातून कोकणात येणारे पर्यटक या महाकाय मगरी पाहण्यासाठी याठिकाणी येतील, अशी मागणी त्यांनी केली आहे. मेरिटाईम बोर्ड, वनविभाग , पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदीची पाहणी करून प्लॅनदेखील तयार केला आहे. मात्र, या नदीत मगरींच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने हा एक चिंतेचा विषय बनला आहे. या नदीत गेल्या दोन वर्षात चार लहान मोठ्या मगरींचा मृत्यू झाला आहे. मगरींच्या मृत्यूचे अधिकृत कारण समोर आले नाही. मात्र नदीतील वाढते प्रदूषण तसेच खेडमधील लोटे एमआयडीसीमधील रासायनिक सांडपाणी या नदीत सोडले जात असल्याने मगरींचा मृत्यू होत असल्याचा आरोप माजी आमदार संजय कदम यांनी यापूर्वी केला होता. वन विभागाचे वनपाल अनिल दळवी यांनी याबाबत मृत मगरींचा व्हिसेरा शवविच्छेदन करून फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला होता. मात्र, काय रिपोर्ट आला हे सांगण्यात आले नाही. मृत मगर जास्त वयोमानाच्या नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आज पुन्हा एकदा याच ठिकाणी जगबुडी नदीत महाकाय मृत मगर आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी खेड आणि भोस्ते गावच्या दरम्यान गणेशघाट परिसरात नदीपात्रात ही मगर मृतावस्थेत आढळली. सकाळी कपडे धुण्यासाठी आणि नदीत अंघोळ करण्यासाठी गेलेल्या स्थानिक लोकांच्या ही बाब निदर्शनास आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळवण्यात आले आहे. तसंच ही मृत मगर पाहाण्यासाठी स्थानिकांनीदेखील सकाळी त्याठिकाणी गर्दी केली होती. मगरींच्या मृत्यूचे कारण लवकरात लवकर समोर यावे अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Crocodile, Death, Jagbudi river, Ratnagiri

पुढील बातम्या