मुंबई, 27 जुलै : रायगड, महाड, नवी मुंबई भागात पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे. तर मुंबई आणि ठाणे उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत असून आज जवळजवळ जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली असून आपले उग्ररूप धारण केले. पुण्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. कालपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग बंद करण्यात आला. खडकवासला धरणात ९६ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती मिळाली आहे. यवतमाळ राळेगावमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळ पासूनच पावसाने जोर धरला आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाला फारच उशीर सुरुवात झाली आहे त्यामुळे खरीप हंगामावर प्रश्नचिन्ह उभा राहिले होते जून महिन्यात पडलेल्या एका पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी केलेला सुरुवात केली त्यानंतर दीड महिन्यानंतर नक्षत्राच्या शेवटच्या दोन दिवसात पाऊस पडू लागला आहे. गेल्या ३ दिवसापासून विदर्भात कमी अधिक पाऊस विविध भागात होत आहे. बंगालच्या उपसागरात ओरिसा आनी आंध्रप्रदेश किनार पट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्यामुळे विदर्भात पुढील ३ दिवस सार्वत्रिक पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.
वर्धा जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळीही रिमझिम पाऊस सुरूच होता. जोर ओसरला असला तरी पाऊस सलग सुरू आहे. आज वर्धा जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अंगणवाडी केंद्रानाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील कारंजा,रिसोड,मंगरुळपिर,वाशिम तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे.