मुंबई 19 मे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात चांगलीच वाढ होत आहे. दिवसेंदिवस तापमान अधिकच वाढत असल्यानं नागरिकांना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच आता काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पुढील पाच दिवस तापमानाचा पारा आणखीच वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या पाच दिवसांमध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे, उष्माघाताने आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अशात नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावं, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. Mumbai Weather Update : उन्हापासून आज होणार की नाही सुटका? पाहा आज मुंबईत किती असेल तापमान गुरुवारी पुण्यातही तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील बहुतेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे होतं. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्येही सूर्य आग ओकतोय. वाढत्या तापमानापासून मुंबईकरांची आजही सुटका होणार नाही. आगामी काही दिवसांमध्ये मुंबई शहरातीलही तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये गुरुवारी (18) मे रोजी कमाल 33° तर किमान 29° तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील नागरिक उकाड्याने हैराण झालेले असतानाच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. जागतिक हवामान संघटनेच्या एका अहवालानुसार, उष्णता शोषून घेणारे हरितगृह वायू आणि एल निनोमुळे येत्या पाच वर्षांमध्ये जागतिक तापमानात विक्रमी वाढ होईल. यात म्हटलं आहे, की 2023 ते 2027 दरम्यान एक वर्ष असं असेल जे जागतिक तापमान वाढीचे सर्व विक्रम मोडेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.