वाशिम, 25 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर (Pooja Chavan Suicide Case) गायब असलेले वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे 23 तारखेला शक्तीप्रदर्शन करत पोहरादेवी इथं दाखल झाले. वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी महंतांना नोटीस बजावल्या होत्या. मात्र तरीही बंजारा बांधव हजारोंच्या संख्येने पोहरादेवीला आल्यामुळं कोरोना वाढणार ही भीती होती आणि तेच खरं ठरलं आहे.
कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. 22 तारखेला 30 नागरिकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महंत यांच्या कुटुंबातील 4 जणांसह आज 8 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने पोहरादेवी येथील महंतांना गर्दी न जमवण्याच्या नोटीस दिल्या होत्या. मात्र तरीही संजय राठोड समर्थकांनी एकच गर्दी केली. त्यामध्ये आज महंत यांच्यासह 8 जण पॉझिटिव्ह आले आहेत. वनमंत्री संजय राठोड यांनी कबिरदास महाराज यांचं दर्शन घेतले होते. त्यामुळे राठोड यांनाही कोरोना टेस्ट करावी लागणार आहे.
हेही वाचा - राज्यात का होतोय कोरोनाचा उद्रेक? सरकारनं सांगितली 3 कारणं
पोहरादेवी येथील महंत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला असून गावात कोरोना टेस्ट सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ अविनाश आहेर यांनी दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा देत या व्हायरसला रोखण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन राज्यातील जनतेला केलं होतं. मात्र ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेल्या संजय राठोड यांनीच हा आवाहनाला हरताळ फासत शक्तीप्रदर्शनासाठी मोठी गर्दी जमवली. त्यामुळे याप्रकरणी उद्धव ठाकरे राठोड यांच्यावर आगामी काळात काही कारवाई करणार का, हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Covid cases, Sanjay rathod, Social distancing, Washim, WASHIM NEWS