वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी वर्धा, 25 मार्च : देशात विदेशी वस्तूंना नाकारून स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यात यावा, अशी भूमिका राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची होती. जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचं आवाहन देखील गांधीजींनी केलं होतं. आता महात्मा गांधी यांची हीच संकल्पना वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम पुढे नेत आहे. उमेश ताकसांडे हे गांधींचा वैचारिक वारसा जपत असून कापूस ते कापड हा प्रकल्प चालवीत आहे. स्वातंत्र्य चळवळीत स्वदेशीचा पुरस्कार महात्मा गांधी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढा यशस्वी करण्यासाठी स्वदेशी चळवळ सुरू केली. चरख्यावर सूत कातून खादी कापड तयार करण्याचा उपक्रम सुरू केला. त्या काळात कापसाची वेचणी करून कापसाची स्वच्छ्ता करणे आणि मग कापड तयार करणे यामध्ये भारतीय कारागीर कुशल होते. 1917 - 18 साली साबरमती आश्रम येथे प्रथम कापडाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर चरख्यावर सूत कातणे हा ही चळवळीचा भाग बनला.
सेवाग्राम आश्रमात कापड निर्मितीचा प्रयोग महात्मा गांधी यांनी सेवाग्राम आश्रमातही स्वदेशीचा पुरस्कार करत चरख्यावर सूत कातण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला. महात्मा गांधी यांचा कापूस ते कापड हा प्रयोग स्वातंत्र्यानंतरही सुरूच राहिला. सध्या उमेश ताकसांडे हे सेवाग्राम आश्रम अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या कापूस ते कापड विभागाचे काम पाहत आहेत. या विभागामार्फत 50 ते 60 जणांना रोजगार निर्माण करून दिला आहे. Success Story: वर्ध्यात बहरली ‘ड्रॅगन फ्रुट’ची शेती, शेतकरी घेतोय लाखोंचे उत्पन्न, Video परदेशी पाहुण्यांची सुती कापडाला पसंती सेवाग्राम आश्रमात एकाच छताखाली कापसापासून ते सूत आणि सुतापासून कापड तयार केले जाते. तर तयार केलेल्या कापडाची विक्री देखील सेवाग्राम आश्रमातच केली जाते. दरवर्षी सेवाग्राम आश्रमात परदेशी पाहुणे येत असतात त्यांची खादी कापडाला पसंती असते. त्यामुळे चरख्यावर सूत कातून तयार केलेले स्वदेशी कापड उमेश ताकसांडे आता देश विदेशात पोहोचवत आहेत.