वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
वर्धा, 15 मार्च : उन्हाळा सुरू झाल्याने थंड पेयाची मागणी वाढली आहे. मात्र, अनेक गावांत 'कूलिंग चार्जेस'च्या नावाखाली अतिरिक्त पैसे घेतले जातात. प्रत्यक्षात एमआरपीत कूलिंग चार्जेसचा समावेश असतो; पण अधिक पैसे कमावण्याच्या नादात थंड पेयावर कूलिंग चार्जेस आकारले जात असल्याचे दिसून येते. वर्धा जिल्हा आणि सर्वच नागरिकांना कूलिंग चार्जेसच्या नावाखाली अधिकच्या पैशाची मागणी करणाऱ्यांविरुद्ध थेट ग्राहक मंचात तक्रार करता येते.
अन्न व औषध प्रशासनाला द्या माहिती
अन्न व औषध प्रशासनाला कूलिंग चार्जेस आकारणाऱ्यांची माहिती दिल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. मात्र, गेल्या तीन वर्षांत अन्न व औषध प्रशासन विभाग सुस्तच असल्याचे चित्र आहे. यंदाच्या उन्हाळ्यात कूलिंग चार्जेसच्या नावाखाली शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून अन्न व औषध विभागाने विशेष मोहीम हाती घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
एमआरपीमध्ये कूलिंग चार्जेस समाविष्ट
कोणत्याही कंपनीकडून थंड पेय तयार करताना कूलिंग चार्जेस एमआरपीमध्ये समाविष्ट केले जातात. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नसते. मात्र, ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेत काही दुकानदार अतिरिक्त पैसे मागतात.
Beed News: बर्फगोळ्यासोबत गाण्याची मेजवानी, बीडच्या विक्रेत्याची सर्वत्र चर्चा, Video
पैसे जास्त घेतल्यास तक्रार कोठे कराल?
निकृष्ट थंड पेयाची विक्री होत असल्यास त्यावर अन्न व औषध प्रशासन धडक कारवाई करू शकते. इतकेच नव्हे तर कूलिंग चार्जेसच्या नावाखाली जास्त पैसे घेतले गेल्यास नागरिकांना ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदविता येते. कूलिंग चार्जेस घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Summer season, Wardha, Wardha news