वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
वर्धा, 9 मार्च : बोर व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात मागील 11 महिन्यांत वाघ तसेच बिबट्याची दहशत वाढली आहे. वाघांनी हल्ला करून आतापर्यंत 8 जणांना ठार मारले तर तब्बल 74 व्यक्तींचे लचके तोडत त्यांना गंभीर जखमी केले आहे. वर्धा जिल्ह्यात बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील ग्रामस्थांना वाघाच्या दहशतीत राहावे लागत आहे. स्थानिक लोक व पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाला अद्याप कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात आलेली नाही.
जंगली प्राण्यांची दहशत
जिल्ह्यात वनविभागाच्या कार्यक्षेत्रात बोर व्याघ्र प्रकल्प आहे. येथील जंगलात वाघ, बिबट्या, अस्वल, काळवीट, लांडगे, कोल्हे यासह विविध वन्यप्राणी वास करतात. या परिसरातील व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये तब्बल 30 पेक्षा अधिक गावे आहेत. ही गावे दहशतीत जगत आहेत. गेल्या 11 महिन्यात वाघ आणि बिबट्यासह जगंली श्वापदांनी बफर क्षेत्रात हल्ला केल्याने 8 जणांचा मृत्यू झाला. तर 74 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.
शेती पिकांचे नुकसान, शेतकरी अडचणीत
मागील अकरा महिन्यांत म्हणजे 1 एप्रिल 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत 441 जनावरांवर हल्ला करत त्यांना शिकार बनविले. याशिवाय 2613 शेतकऱ्यांच्या शेतीपीकांचे वन्यप्राण्यांनी नुकसान केले आहे. शेतातील पीक फस्त केले आहे. वाघांचा बंदोवस्त करून सदर गावांचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी बफर झोनमधील ग्रामस्थांनी अनेकवेळा निवेदने दिली आहेत. मात्र, अद्याप वनविभागाकडून कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही.
वनविभागाकडून 4 कोटींची मदत
शासनाकडून मृतकांच्या कुटुंबियांना 1 कोटी 40 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. तर शेती पिकांच्या नुकसानीसाठी 2613 शेतकऱ्यांना 1 कोटी 42 लाख 93 हजारांची मदत केली. 74 जखमी व्यक्तींना 59 लाख 96 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. याप्रमाणे नुकसानभरपाई म्हणून एकूण 4 कोटी 6 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
जालन्यातील शेतकऱ्यानं 2 एकर टोमॅटोमध्ये सोडली जनावरं, भाव न मिळाल्यानं झाली अवस्था! Video
441 पशुधनांची केली शिकार
जंगल परिसरात मागील 11 महिन्यांत वाघ, बिबट्या व इतर हिस्त्र प्राण्यांनी तब्बल 441 पशुधनाची शिकार केली आहे. त्यासाठी पशुपालकांना वनविभागाकडून 63 लाख 85 हजार रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Tiger attack, Wardha, Wardha news