विशाल पाटील, प्रतिनिधी मुंबई, 19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती (Shiv Jayanti 2022) निमित्ताने शिवसंग्राम (Shivsangram संघटनेकडून मुंबईत (Mumbai) विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रवीण दरेकर (Pravin Darekar), आशिष शेलार (Ashish Shelar), राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे ते हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहू शकले नव्हते. याशिवाय अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नव्हते. तसेच कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रत्यक्ष राज्यात न फिरता मुंबईतूनच महत्त्वाचे निर्णय घेतले. पण त्यांच्या या कार्यपद्धतीवरुन भाजप नेत्यांकडून टीका करण्यात येत होती. विशेष म्हणजे आता शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी नाव न घेता निशाणा साधला आहे. पण त्यांनी तो निशाणा नेमका मुख्यमंत्र्यांवर साधलाय की वेगळं कुणावर ते स्पष्ट केलं नाही. “घरात बसून बांगड्या भरुन बोलण्याचे काम आम्ही करत नाही”, अशा खोचक शब्दांमध्ये त्यांनी टीका केली आहे. विनायक मेटे नेमकं काय म्हणाले? “मुंबईच्या शिवाजी पार्कात महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याव्यतिरिक्त कार्यक्रम झाला नाही. हे मैदान शिवाजी महाराजांच्या जयंतीला उपलब्ध होत नाही, ही शोकांतिका आहे. राज्यपालांना विनंती आहे की हे मैदान 19 फेब्रुवारीसाठी राखीव ठेवा. अनेक कार्यक्रम करणार होतो. पण परवानगी दिली नाही. शासनाला, प्रशासनाला महाराजांबद्दल राग का?”, असा सवाल विनायक मेटे यांनी केला. ( ‘सत्तेत राहुनही काँग्रेसला कोणी विचारत नाही’, विखे पाटलांची सडकून टीका ) “शिवाजी महारांच्याबाबत राजकरण होऊ शकत नाही. घरात बसून बांगड्या भरुन बोलण्याचे काम आम्ही करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोरखेळ सरकारने चालवला आहे. हे सरकार कधी जाईल हे कळणार नाही”, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे : “शिवाजीपार्क येथे विनायक मेटे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. तुमचं मनापासून अभिनंदन, दिमाखदार सोहळा केलात. कारणे अनेक दिलेत, महाराजांच्या जयंतीला अनेक निर्बंध लावलेत. कळत नाही की हे निर्बंध नेमके कोणाच्या राज्यात आहेत? अनेक लोक फक्त महाराजांच्या नावाचा वापर करतात. वागण्यात मात्र सगळं विसरतात. संघर्ष हा सुरुच राहील, शिवाजी महाराजांचे रक्त प्रत्येकाचा मनात आहे. सामान्य माणसाचा विजय होईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “विनायक मेटे यांनी एक खंत व्यक्त केली. पण आपल्याला फार काळ ही खंत व्यक्त करावी लागणार नाही. जे लोकं महाराजांचे सोहळे अडवतात, जे त्यामध्ये अडथळे निर्माण करतात,जे लोकं दुटप्पी भूमिका घेतात त्यांना महाराजच शासन करतो हा विश्वास मी व्यक्त करतो”, असा टोला फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.