सांगली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील काही गावांवर दावा केला आहे. पाणी प्रश्नावरून या गावातील ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. तसेच तसा प्रस्ताव देखील तयार केला होता. आता या प्रस्तावाचा संदर्भ घेऊन महाराष्ट्र सरकारने या गावांच्या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करावा असं बोम्मई यांनी म्हटलं आहे. एकीकडे बोम्मई यांच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं असतानाच आता दुसरीकडे जत तालुका पाणी कृती समितीची बैठक आज उमदी गावात पार पडली आहे. पाणी प्रश्न न सुटल्यास पुन्हा एकदा नव्याने ठराव करू असा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. ग्रामस्थ आक्रमक या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आज जत तालुका पाणी कृती समितीची बैठक उमदी गावात पार पडली. या बैठकीतून सरकारला इशारा देण्यात आला आहे. उमदी गावात येऊन मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनी पाणी देणार की नाही हे या आठवड्यात सांगावे. ही शेवटची संधी. या प्रश्नावर बैठक घ्या अन्यथा नव्याने कर्नाटक राज्यात जाण्याचा ठराव करू, येत्या आठवडाभरात निर्णय नाही घेतल्यास गावात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आणलं जाईल, असा इशारा उमदी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. पंढरपूरच्या नागरिकांचाही इशारा दरम्यान दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या नागरिकांनी देखील कर्नाटक राज्यात जाण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांचा कॉरीडोरला विरोध आहे. राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी अन्यथा पुढील आषाढी एकादशीला महापुजेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावू असा इशारा पंढरपूरकरांच्या वतीने देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.