सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 14 जानेवारी : रिपाइंचे नेते आणि सामाजिक राज्य न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या सभेत तुफान राडा पाहण्यास मिळाला. औरंगाबादेत नामविस्तार दिनाच्या निमित्ताने रिपाइंच्या वतीने सभेचं आयोजन करण्यात आले होते. या सभेत संतप्त जमावाने मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची तोडफोड केली आहे. व्यासपीठावर एका स्थानिक नेत्याने भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरला होता. त्यामुळे, एक तरुणांचा गट संतापला आणि त्यांनी तोडफोड सुरू केली. संतप्त तरुणांनी खुर्च्यांची तोडफोड केली आणि व्यासपीठाच्या दिशेनं दगडं ही भिरकावली. पण, वेळीच पोलिसांनी धाव घेऊन संतप्त जमावाला पांगवले आहे. अचानक झालेल्या गोंधळामुळे वातावरण तापले होते. परंतु, पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे वातावरण निवळले आहे. रामदास आठवले यांची सभा सुरळीत सुरू आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं पोलिसांनी आवाहन केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.