नागपूर, 13 फेब्रुवारी : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर संजय राठोड या मंत्र्याचं नाव घेतलं जात असल्याने आधीच ठाकरे सरकारची चिंता वाढवली आहे. यात आता आणखी एक भर पडली आहे. काल नाना पटोले यांच्या कार्यक्रमादरम्यान एका खासदाराने भर व्यासपीठावरुन अपशब्दाचा वापर केला होता. त्यानंतर आणखी एका मंत्र्याने धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अलीकडे साधू हे मनोरुग्ण आहेत, व साधुंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाही; असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवारांनी केलं आहे. ते नागपूर येथून बोलत होते. पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राला संतांची संस्कृती लाभलेली आहे. महाराष्ट्र संतांच्या शिकवणीवर उभा राहिला. संत व साधू हे वेगवेगळे आहे. संत हे समाजासाठी समर्पित आहे. संत हा समाजाचा दिशादर्शक आहे पण हे साधू लुबाडणारे असतात. साधू संपत्ती उभारणारे असतात. त्या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. ज्याला जी टीका करायची असेल करा, असं थेट इशारा वडेट्टीवारांनी दिला आहे. ओबीसी समाजाने साधूंच्या मागे लागू नये, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा-काँग्रेस खासदाराची जीभ घसरली; नानांच्या सोहळ्यादरम्यान वादग्रस्त शब्दाचा वापर
तुषार भोसले कोण आहे? टीळा लावला व अध्यक्ष झाला म्हणजे विद्वान होतं का? चार पुस्तके त्यांनी वाचली चार पुस्तके आम्ही. आताचे साधू मनोरुग्ण आहेत. जे समाजाला अंधश्रद्धेत व धर्मांधतेत गुंतून त्यांचं शोषण करतात. त्यामुळे या विरोधात आम्ही बोलणारच, असंही त्यांनी ठासून सांगितलं. यानंतर या विधानानंतर भाजपकडून टीका होण्याची शक्यता आहे. साधूंबाबत केलेलं वक्तव्यावरुन भाजप घेराव घालू शकते.