VIDEO : चोर हॉटेलमध्ये शिरला, पोटभर जेवला.. मात्र गल्ल्याला हातही लावला नाही; वास्तव दाखवणारी घटना

VIDEO : चोर हॉटेलमध्ये शिरला, पोटभर जेवला.. मात्र गल्ल्याला हातही लावला नाही; वास्तव दाखवणारी घटना

या चोरीचे फुटेज पाहून हॉटेल मालकही हबकला...

  • Share this:

चंद्रपूर : सध्या कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यात आता गुन्ह्याची संख्याही वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान चंद्रपुरात एक विचित्र चोरीचा प्रकार समोर आला आहे. या चोऱ्याने चोरी केली, हॉटेलमधील गल्ल्याला हात लावला नाही...

चंद्रपूरच्या सचिन हॉटेलमधील या प्रकाराने लॉकडाऊनमधील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. 4 दिवसांच्या जनता कर्फ्युत भुकेला चोर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. चोराने हॉटेलमध्ये प्रवेश केला. पोटभर जेवला...खिशात पदार्थ भरुन नेले. त्याने हॉलेटमधील गल्ला उघडला आणि  रक्कम मोजून जागेवर ठेवली. असं कसं काय? चोराने चोरी का केली नाही?  चोराचा प्रामाणिकपणा पाहून हॉटेलचालकाने पोलिसात तक्रारही केली नाही. (Chandrapur Honest Thief). कोरोनामुळे सर्वांचेच हाल झाले आहे. कित्येक महिने हॉटेल व्यवसाय बंद होता. आता कुठे गाडी रुळावर येत आहे.

कोरोना संकटाने गोरगरिबांचे खाण्याचे कसे वांधे केले, याचा प्रत्यय आणून देणारी एक घटना चंद्रपुरात घडली. पैशाचे बंडल हाती लागले असतानाही चोराने ते जसेच्या तसे ठेवले आणि खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन निघून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि गरिबांच्या भुकेचा आणि प्रमाणिकतेचाही प्रत्यय आला. चंद्रपूर-नागपूर महामार्गावर हॉटेल सचिन आहे. लोकवस्तीपासून थोडे दूर आहे, पण अगदी हायवेवर आहे. याच हॉटेलमध्ये घडलेली ही घटना आहे.

चंद्रपुरात 10 तारखेपासून जनता कर्फ्यु लागू करण्यात आला. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी येथील जनजीवन ठप्प झाले होते. दुकाने, हॉटेल्स, रोजगार सारे काही बंद होते. हातावर पोट असणाऱ्यांना या काळात मोठी अडचण झाली आहे. रोजगार नाही, त्यामुळे हातात पैसे नाहीत. मग खायचे काय, असा प्रश्न एका युवकाला पडला आणि शेवटचा उपाय म्हणून त्याने अन्न पदार्थांची चोरी करण्याचे ठरवले.

हे ही वाचा-मास्क न घालणाऱ्यांना अशी शिक्षा, खोदावी लागणार कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची कबर

10 सप्टेंबरच्या रात्री हा युवक हॉटल सचिनमध्ये घुसला. भूक आणि तहानेने व्याकुळ झालेल्या या चोराने आधी फ्रिजमधून पाण्याची बाटली काढली आणि मनसोक्त पाणी प्यायला. ती बाटली परत फ्रीजमध्ये ठेवली. त्यानंतर त्याने खाद्य पदार्थाकडे मोर्चा वळवला. हाती जे लागेल ते त्याने आरामात खाल्ले, काही खिशात भरले. कदाचित तो घरच्या लोकांसाठी नेत असावा. नंतर मालकाच्या खुर्चीवर जाऊन बसला. टेबलाचे रकाने उघडून बघितले. त्यात त्याला मोठी रक्कम दिसली. मात्र ही रक्कम त्याने जशीच्यातशी ठेवली आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशी हॉटेल मालकाने हे फुटेज बघितले, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्यांनी लगेच पैसे तपासले, ते तसेच ठेवलेले दिसले. केवळ भुकेपोटी या युवकाने हे कृत्य केले, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलीस तक्रारही केली नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: September 15, 2020, 2:57 PM IST

ताज्या बातम्या