प्रशांत मोहिते, प्रतिनिधी
नागपूर, 27 जानेवारी : तीन तलाकच्या कायद्यानंतरसुद्धा 'तलाक तलाक तलाक' बोलून घटस्फोट दिला जात आहे. नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनात हा प्रकार उघडकीस आला आहे. पत्र पाठवून आपल्या पत्नीला तिहेरी तालक देणाऱ्या सूरतच्या व्यावसायिकाविरूद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरातील तिहेरी तलाकची ही दुसरी घटना असून मानकापूर पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला होता.
तलाक देणारा आरोपी हा मोईन अब्दुल करीम नूरानी (39), रा.सूरतचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. मोईन सूरत येथे एका टेक्सटाईल कंपनीत काम करतो. तहसील पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या पीडित महिलेचे 13 वर्षांपूर्वी मोईनशी लग्न झाले होते. लग्नानंतर थोड्याच दिवसांत मोईनने तिला त्रास देणे सुरू केले.
तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. याचा निषेध म्हणून पीडितेने सुरत पोलिसांकडे तक्रार केली होती. मोईनवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु तो सुधारला नाही. वारंवार मारहाणीमुळे त्रस्त झालेली पीडित मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत नागपुरात राहायला आली. ती ८ वर्षांपासून आपल्या माहेरी राहत आहे.
इतर बातम्या - मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पंकजा मुंडे आज उपोषण करणार
काही दिवसांपूर्वी मोईनने तिला एक पत्र पाठवले होते. या पत्रामध्ये गुजराती भाषेत 3 वेळा तलाक असे लिहिले होते. याबाबत पीडित मुलीने तहसील पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी मोईनविरूद्ध तिहेरी तलाकसाठी तयार केलेल्या नव्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून न्याय मागितला आहे.
पीडित मुलीला दोन मुली आहेत. अशात आता समाजाची परवा न करता पीडित मुलगी तीन तलाकच्या कायद्यासोबत आपला संघर्ष करणार असून तीन तलाकचा कायदा आपल्यासारख्या मुलींना एक नवं जीवन देणार असल्याचे पीडिता आणि तिच्या कुटुंबियांचे मत आहे.
इतर बातम्या - कोरोना व्हायरसने भारताचा धोका वाढवला, चीनहून आलेला विद्यार्थी जयपूर रुग्णालयात
पीडित मुलीचे वडीलसुद्धा तीन तलाक कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या मुलीला न्याय देऊ असं मत व्यक्त करत आहेत. समाजाचा भीतीमुळे अजूनही लोक तीन तलाकच्या घटनेला कायद्याच्या उपयोग करून घेत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.