औरंगाबाद, 27 जानेवारी : मराठवाड्याचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून येथील जनतेच्या सर्वांगिण समृद्धीसाठी पाण्याची उपलब्धता अत्यावश्यक आहे. यासाठी भाजपच्या माजी नेत्या पंकजा मुंडे आज लाक्षणिक उपोषण करणार आहेत. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे या लाक्षणिक उपोषण करणार असून मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण होणार आहे.
एक दिवस आपल्या विभागासाठी.आपल्या भविष्यासाठी..@Dev_Fadnavis
मराठवाड्यात पाण्याची वण वण संपवून समृद्धी ची सत्ता स्थापना व्हावी यासाठी माझं उपोषण एक लक्षवेधी प्रयास आहे!! उपोषण आक्षेपासाठी नाही ही अपेक्षांसाठी आहे ..मागचे 5 वर्ष प्रयत्न झाले पुढे ही व्हावे आणि होतील ही रास्त अपेक्षा आहे ..आपण ही साथ दयावी 🙏🏻🙏🏻
यापूर्वी 12 डिसेंबर रोजी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मराठवाड्याचा उत्कर्ष हा सर्वस्वी पाण्यावर अवलंबून आहे. मराठवाड्याला जलसंपदा, जलसंधारणाच्या माध्यमातून पुरेसं पाणी मिळायलं हवं. यातून शेती चांगली होईल आणि शेतकऱ्याला दिलासा मिळेल. दुसरीकडे मुलांचं शिक्षण, पोषण रोजगार मिळालयला हवं. मात्र मराठवाड्यात सर्वात कळीचा मुद्दा पाणी हा आहे. मराठवाड्यात पाणी आलं तर येथील स्थलांतरही थांबवता येईल, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर जनतेला आवाहन केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, विविध राजकीय पक्षांनी, स्वयंसेवी संस्थानी आणि मान्यवरांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून मराठवाड्याला दुष्काळाच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी व वाळवंट होण्यापासून वाचवण्यासाठी राजकीय पक्ष, माध्यमं आणि सेवाभावी संस्था यांची मोटं बांधणे आवश्यक आहे. कर्जमाफी हा एक उपाय आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पण कायमस्वरुपी मराठवाड्याच्या जनतेला स्वावलंबी बनवण्यासाठी शेतीला पाणी असणे आवश्यक आहे.