हिंगणघाट 10 फेब्रुवारी : गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेली हिंगणघाटच्या पीडितेची झुंज अखेर आज संपली. सकाळी 6.55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. हे वृत्त हिंगणघाटमध्ये पोहोचताच लोकांमध्ये संतापाची एकच लाट उसळली. प्राध्यापिका असलेली पीडिता उपचारानंतर बरी होई अशी लोकांना अपेक्षा होती. ज्या क्रुरपणे विकेश नगराळे या आरोपीने तिला जाळलं होतं त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप होता. हा संताप आता आणखी वाढला असून आरोपीला लोकांच्या स्वाधीन करा अशी मागणी पीडित प्राध्यापिकेच्या वडिलांनी केलीय.
ते म्हणाले, निर्भया प्रकरणात एवढी वर्ष होऊनही आरोपींना फाशी झालेली नाही. आता तरी असं होऊ नये. त्या आरोपीला आमच्या स्वाधीन करा. तिला जसा त्रास झाला तसाच त्रास त्यालाही झाला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी दिलीय.
पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी 6.55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. आज सकाळी 7.40 मिनिटांनी हिंगणघाट पीडितेच्या मेडिकल बुलेटिनमध्ये डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली. डॉक्टरांकडून तिला वाचविण्यासाठी पूरेपूर प्रयत्न केले जात होते. मात्र आज सकाळी तिच्या ह्रदयाचे ठोके कमी झाले होते त्यातच तिचा दुर्देवी मृत्यू झाला.
गेल्या दोन दिवसांपासून पीडित तरुणी व्हेंटिलेटरवर होती. हळूहळू तिच्या शरीरातील अवयव निकामी होत गेले. ह्रदय, यकृत, मूत्रपिंड सर्वच अवयव निकामी झाल्याने पीडितेचा मृत्यू ओढवला. दरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलखीची असल्याने या पीडितेच्या उपचाराचा खर्च सरकारने घेतला होता.
पीडितेसाठी रुग्णालयात स्पेशल कक्ष तयार करण्यात आला होता व त्या ठिकाणी दोन डॉक्टर व 7 नर्सेसची 24 तास नेमणूक करण्यात आली होती. पीडितेला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र तिची झुंज अखेर संपली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.