अमोल गावंडे,(प्रतिनिधी) बुलडाणा,19 नोव्हेंबर: काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंग चौहान यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना ‘खुर्ची’ भेट देऊन अनोखे आंदोलन केले आहे. राज्यात कोणताच पक्ष सत्ता स्थापन करत नाही, म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, याकडे कोणत्या पक्षाचे लक्ष नाही. सर्व मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी भांडताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. मात्र, सत्ता स्थापन्यासाठी जनतेने एकट्या भाजपला कौल दिलेला नाही. तरी देखील भाजपने राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा होईल, असा दावा केला आहे. राज्यपालांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 8 हजार रुपये मदत जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना लागणारा खर्च त्यापेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे प्रशासनाने एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. राज्यात मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी वाद सुरू असताना बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंग चौहान यांनी अनोखे आंदोलन करत तहसिलदारांमार्फत राज्यपालांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची भेट दिली आहे. लवकर सत्ता स्थापन करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी सुद्धा मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात सत्ता संघर्षात भाजप-सेनेमध्ये फूट पडली. राज्यातील युतीचे बिनसल्यानंतर केंद्रातल्या मंत्रिपदाचा शिवसेना खासदारांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) नसल्याचे भाजप नेत्याकडून जाहीर करण्यात आले आहे. यावरून शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर हल्ला चढवला आहे. आम्हाला एनडीएतून काढणारे तुम्ही कोण असा थेट सवाल सेनेनं विचारला आहे. आम्ही एनडीएत नसल्याची घोषणा कशाच्या आधारावर आणि कुणाच्या परवानगीने केली असेही विचारले आहे. एनडीएच्या जन्मकळा आणि बाळंतपणाच्या वेदना शिवसेनेने अनुभवल्या असून ज्यांनी ही घोषणा केली त्यांना सेनेचे मर्म आणि एनडीएचे कर्म माहिती नसल्याचा टोलाही लगावला आहे. शिवसेनेची काँग्रेसशी जवळीक वाढली अशी चर्चा भाजपच्या गोटात चालली आहे. पण असे काही होत असेल तर एनडीएने त्यावर बैठक बोलावली पाहिजे. यावर चर्चा करून शिवसेनेवर आरोपपत्र का ठोकले नाही, असा सवालही अग्रलेखात केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







