मुंबई, 07 नोव्हेंबर : कोरोनाचा धोका आणि वाढणारा संसर्ग त्यातली जोखीम लक्षात घेऊन यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्यायची की मुंबईत याबाबत चर्चा सुरू आहे. यंदा हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना भाजप आमदारांकडून मात्र हे अधिवेशन मुंबईत नको नागपुरात घ्या अशी मागणी केली जात आहे. कोरोनाची सगळी खबरदारी घेऊन अधिवेशन नागपुरात घ्यावं अशी मागणी भाजपच्या आमदारांकडून केली जात असताना ठाकरे सरकार याबाबत अंतिम निर्णय काय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
7 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार असं सांगितलं जात आहे. मात्र कोरोनाचा धोका पाहता हे अधिवेशन होणार की नाही याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. यंदा हे अधिवेशन मुंबईतच घेण्याबाबत ठाकरे सरकार विचार करत आहे. यासंदर्भात निर्णय सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल पण सध्या नागपुरात या अधिवेशनाची तयार सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार निवास तपासणं आणि सॅनिटायझेशन या सगळ्या गोष्टींची तयारी केली जात आहे.
हे वाचा-तुमच्या कंप्यूटरमध्ये व्हायरस आहे असं सांगत...चोरट्यांकडून तब्बल 8 कोटींची फसवणू
कोरोनामुळे यंदा मुंबईमध्ये 2 दिवसांचं पावसाळी अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. कोरोना टेस्ट, मास्क, सोशल डिस्टन्स, थर्मल स्कॅनिंग करून आमदारांना विधिमंडळात प्रवेश देण्यात आला होता. आताच हिवाळी अधिवेशन मुंबईत घ्यायचं की नागपुरात यासंदर्भात अद्यापही ठोस निर्णय आला नाही मात्र नागपुरात तयारी सुरू करण्यात आली आहे. जर कोरोनामुळे नागपूर ऐवजी मुंबईत अधिवेशन पार पडलं तर पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेतलं जाऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.