मुंबई, 26 ऑगस्ट : मागच्या दोन महिन्यांपासून होणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतमालाला सर्वाधिक फटका बसल्याचे दिसून येत आहे. आधिच महागाईने कंबरडे मोडलेल्या सामान्यांच्या खिशाला आणखी चाट बसणार आहे. (Vegetable Rate) राज्यातील सर्वच बाजारसमित्यांमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांचे दर गगणाला भिडले आहेत. कोथिंबीरची एक पेंडी 100 रुपयांच्यावर तर पनीरपेक्षा मटर महाग अशी अवस्था झाली आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत असला तरी शेतात उत्पादन कमी येत असल्याने भाजीपाल्यांचे दर वाढत आहेत.
ऐन सणासुदीच्या काळात भाज्यांच्या दरात वाढ झाल्याने सामान्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली आहे. पुढच्या काळात भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांसह राज्यातील महत्वाच्या शहरात भाजीपाल्यांसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
हे ही वाचा : Cotton Rate : कापसाच्या दरात मोठी वाढ शेतकऱ्यांना अच्छे दिन तर सूत गिरण्या संकटात?
एपीएमसी मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आला होता परंतु पावसामुळे पडून राहिल्याने तो खराबही झाला आहे. पावसामुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. परिणामी भाज्यांची आवक कमी झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातून येणाऱ्या भाज्या अवकाळी पावसामुळे न आल्याने राज्यातील मुख्य शहरात दर वाढत असल्याचे दिसून येत आहे. भाजीपाल्याचे नगदी पीक खराब झाले आहे. या संकटांमुळे भाजीपाल्याच्या दरांनी कहर केला आहे. कोंथबीरीच्या पेंडीला 100 ते 150 रुपये मोजावे लागत आहेत तर ढबू, वांग्यासाठी 100 रुपये किलो मोजावे लागत आहेत. तर कोबीचे दर 80 रुपयांहून थेट 120 रुपयांवर गेले आहेत.
याचबरोबर पनीरपेक्षा मटरचा रेट झाल्याने मसालेदार भाजीवर चांगलाच महागाईचा तडका बसला आहे. बाजारात भाज्यांचे दर पहायला गेल्यास पनीर आपल्या जिभेला चव देईल पण भाज्यांच्या दराने आपल्या जिभेची चव जाण्याची शक्यता आहे. वाटाण्याचे दर 120 रुपये किलोहून थेट 240 रुपये किलोवर गेले आहेत. एकीकडे घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलसह सीएनजीपासून ते दुधापर्यंत सर्वाचेच दर प्रचंड वाढले आहेत त्यामुळे जगायचे कसे, खायचे काय असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आहे.
भाज्यांचे दर किती वाढले?
भाज्या | आताचे दर | आठवडाभर आधीचे दर |
---|---|---|
पालक | 200 रुपये | 80 रुपये |
मेथी | 160 रुपये | 80 रुपये |
वांगी | 120 रुपये | 60 रुपये |
मटर | 220 रुपये | 120 रुपये |
फुलकोबी | 120 रुपये | 80 रुपये |
टोमॅटो | 60रुपये | 30 रुपये |
कोथिंबीर | 200रुपये (जोडी) | 80 रुपये |
शिमला मिरची | 120 रुपये | 100 रुपये |