नाशिक, 28 डिसेंबर : नाशिक (nashik) जिल्ह्यातील मखमलाबाद इथं तीन अल्पवयीन शाळकरी मुलांचा (3 children drown in Nashik) पाटाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तिन्ही मुलांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मखमलाबाद पेठ लिंक रोडवरील तुळजाभवानी नगर इथं ही घटना घडली आहे. निलेश मुळे, प्रमोद जाधव, सिद्धू धोत्रे असं या मयत मुलांची नावे असून या तिघांचे वय अंदाजे १४ ते १५ वर्ष आहे.
हे तिन्ही मित्र आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास आपल्या शाळेतील इतर 5 मित्रांसह पाटावर पोहण्यासाठी गेले होते. पाण्यात उतरल्यानंतर सर्वजण आनंद लुटत होते. पण पाण्यात पुढे गेल्यावर त्यांना पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे या पाच जणांमधील तिघे जण पाण्यात बुडू लागले.
आपले मित्र पाण्यात बुडूत असल्याचे पाहून दोघांना आरडाओरडा केला. पाण्यातून बाहेर इथं आजूबाजूच्या लोकांना सांगून मदतीसाठी याचना केली. पण, परिस्थितीमुळे घाबरलेल्या या दोन मुलांना या ठिकाणाहून पळ काढला. नंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता तिघे जण पाण्यात बुडाल्याचे आढळले.
स्थानिकांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला आणि पोलिसांना दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अवघ्या अर्धा तासात तिघांना पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र दुर्दैवाने या तिघाही मुलांचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासना कडून देण्यात आली.
निलेश मुळे, प्रमोद जाधव, सिद्धू धोत्रे या तिन्ही लहान मुलांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या आवारात एकच आक्रोश केला. पालकांचा आक्रोश पाहून उपस्थितीत लोकांच्या डोळ्यातून पाणी आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.