मुंबई, 13 ऑक्टोबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला आज हायकोर्टाकडून सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व मतदारसंघाची जागा रिकामी झाली होती. या जागेसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून उमेदवार याआधीच जाहीर करण्यात आले होते. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अडचणीत सापडली होती. कारण रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या महापालिकेत कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या महापालिकेच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. पण तो राजीनामा जोपर्यंत मंजूर करण्यात येत नाही तोपर्यंत त्यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार नव्हता. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक होते. पण महापालिका प्रशासनाकडून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मोठं राजकीय घमासान बघायला मिळालं. अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. अखेर मुंबई महापालिकेच्या वरिष्ठांनी ऋतुजा लटरे यांचा राजीनामा स्वीकार करावा यासाठी ठाकरे गट मुंबई हायकोर्टात गेलं. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी लटके यांना दिलासा दिला. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी सुनावणी देताना मुंबई महापालिका प्रशासनाला ऋतुजा लटके यांचा राजीनामा उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत राजीनामा स्वीकार करावा, असे स्पष्ट निर्देश दिले. तसेच पालिका आयुक्तांनी राजीनामा मंजुरीबाबत ऋतुजा लटके यांना स्पष्ट रिप्लाय द्यावा आणि कोर्टाला माहिती द्यावी, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. ऋतुजा लटके आणि शिवसेनेसाठी हा खूप मोठा दिलासा आहे. आता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नेमक्या काय-काय घडामोडी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आता पुढे काय होणार? अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून याआधीच उमेदवाराची घोषणा झाली आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर झालीय. विशेष म्हणजे मुरजी पटेल यांनी मतदारसंघात जोरदार प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. पण राजकारणात कधी काय होईल, याचा काहीच भरोसा नाही. कारण गेल्या दोन दिवसांपासूनच्या घडामोडी पाहता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात संभ्रमाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे मुरजी पटेल यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यासाठी पक्षादेश सर्वश्रेष्ठ आहे. पक्षाने सांगितलं तर आपण पोटनिवडणुकीला उभं राहणार नाही, अशी प्रतिक्रिया मुरजी पटेल यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. ( उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदेंना झटका; अंधेरी पोटनिवडणुकीबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट ) दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गोटात अनेक घडामोडी घडत आहे. शिंदे गटाचा उमेदवार नेमका कोण असेल याबाबत विविध चर्चा सुरु आहेत. पण याबाबत आज रात्री उशिरापर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अनेक दिवसांपासून उमेदवार जाहीर झाला होता. पण गेल्या आठवड्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात झालेल्या न्यायालयीन लढाईमुळे शिंदे गटाचा उमेदवार पोटनिवडणुकीसाठी उभं करण्याचा निर्णय झाल्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटासाठी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी तात्पुरती नवी नावे आणि चिन्हे जाहीर केली आहेत. त्यामुळे कदाचित शिंदे गट या जागेवर आपला उमेदवार उभं करण्यासाठी जास्त आग्रही असल्याची चर्चा आहे. भाजप आणि शिंदे गटात उमेदवार ठरवणं आणि पोटनिवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी घडामोडी एकीकडे घडत होत्या तर दुसरीकडे ठाकरे गटात प्रचंड वेगाने घडामोडी घडत होत्या. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने स्वीकारलेला नव्हता. त्यामुळे त्यांची उमेदवारीच धोक्यात आली होती. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने स्वीकारला नाही तर ठाकरे गटाकडून प्लॅन बी आखला जात होता, अशी माहिती सूत्रांकडून येत होती. पण या दरम्यान शिवसेनेच्या स्थानिक माजी नगरसेवकांच्या अंतर्गत गटबाजीचा प्रश्न उपस्थित होण्याची चिन्हं दिसत होती. या सगळ्या घडामोडी समांतरपणे घडत होत्या. या दरम्यान ऋतुजा लटके यांना हायकोर्टाने दिलासा दिला. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके या पोटनिवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.