मुंबई, 23 ऑक्टोबर : परतीच्या पावसामुळे मराठवाड्यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये आले होते. दहेगाव आणि गंगापूर परिसरातील गावांची त्यांनी पाहणी केली. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून टीका करण्यात आली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला. ‘ते आले, त्यांनी पाहिलं, पण त्यांना त्यातलं किती समजलं माहिती नाही, कारण त्यांचा हा दौरा तासभरच होता. शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले होते, त्यांना बटाटे जमिनीवर लागतात का जमिनीखाली हे माहिती नाही. त्यांना शेतीतील काय कळणार? असे सूचक उद्गार पवारांनी उद्धव ठाकरेंबद्दल काढले होते,’ असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला.
सत्ता होती तेव्हा कोणीच आपले यांना वाटले नाही
— Naresh Mhaske (@nareshmhaske) October 23, 2022
आता मात्र पदोपदी आठवण शेतकऱ्यांची येई
पण उद्धवजी, लोक आता फार हुशार झालेत
खायचे आणि दाखवायचे त्यांना बरोबर कळू लागलेत#उद्भवठाकरे #दौरा #शेतकरी pic.twitter.com/L9v8Bow3Z7
‘बांद्र्यावरून ते बांधावर कधी पोहोचले कळलंच नाही. याआधी कधी मातोश्रीमधून, वर्षामधून बाहेर पडलेत का? मुख्यमंत्री असताना 25 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देतो म्हणाले होते, पण याआधी कधी ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले का?’ असा सवालही नरेश म्हस्के यांनी विचारला. ‘ही शिल्लक सेना वाचवण्यासाठी आणि काम करणाऱ्या सरकारवर टीका करण्यासाठी संभाजीनगरचे लोकप्रतिनिधी शिंदेंसोबत आहेत, त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी हा दौरा काढण्यात आला,’ असा आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. ’…तेव्हा मी आणि मोदी घरातच होतो,’ भाजप-शिंदेंच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा पलटवार