यवतमाळ, 16 ऑगस्ट : यवतमाळ शहारापासून 7 किमी अंतरावर असलेल्या आणि शहराची ताण भागवणाऱ्या निळोणा धरणात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत.
पाऊस पडत असल्याने शहारा पासून काही अंतरावर असलेले निळोणा धरण तुडुंब भरले असून ओसंडून वाहत आहे. त्यामुळे हे धरण बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. दुपारी 3 वाजताच्या सुमारास विशाल आडे आणि वृषभ कनाके हे दोघे मित्र निळोणा धरणावर गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर तलावातील पाणी बघताना त्यांना या पाण्यात पोहण्याचा मोह झाला.
पोहण्यासाठी दोघेही मित्र पाण्यात उतरले. मात्र त्या ठिकाणी पाणी खोल असल्या कारणाने एक जण पाण्यात बुडू लागला. ते लक्षात येताच दुसरा मित्र त्याला वाचवण्यासाठी गेला. मात्र दोघेही खोल पाण्यात बुडाले. यावेळी काही उपस्थितांनी आरडा ओरड केला, तर काहींनी याबाबतची माहिती प्रशासनाला दिली.
हेही वाचा-पुणे जिल्ह्यातही पुराचा धोका? नागरिकांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा
ही माहिती मिळताच बचाव करण्यासाठी एक चमू या ठिकाणी दाखल झाला. या चमूने बुडालेल्या तरुणांच्या शोधकार्याला सुरुवात केली. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने दोघांचाही शोध लागू शकला नाही. याबाबतची माहिती मिळताच तरुणांचे नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले. दोघेही बुडाल्याचं कळताच नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.