मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

साईंच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांकडून होणार टोलवसुली, शिर्डी नगरपंचायतीच्या निर्णयामुळे पेटला वाद

साईंच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांकडून होणार टोलवसुली, शिर्डी नगरपंचायतीच्या निर्णयामुळे पेटला वाद

साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून अशा प्रकरणाचा कोणताही टोल आकारणी करू देणार नाही, असा इशाराच सेना आणि राष्ट्रवादीने दिला आहे.

साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून अशा प्रकरणाचा कोणताही टोल आकारणी करू देणार नाही, असा इशाराच सेना आणि राष्ट्रवादीने दिला आहे.

साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून अशा प्रकरणाचा कोणताही टोल आकारणी करू देणार नाही, असा इशाराच सेना आणि राष्ट्रवादीने दिला आहे.

शिर्डी, 06 मार्च : साईबाबाच्या दर्शनासाठी देशभरातून आणि राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना आता कर द्यावा लागणार आहे. शिर्डीत येणाऱ्या भाविकांना प्रवेश कर देण्याचा ठराव शिर्डी नगरपंचायतीने केला आहे. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षापूर्वी बंद झालेले नाके पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. नगरपंचायतीच्या या ठरावाला शिवसेना आणि राष्ट्रवादीने विरोध केला आहे. त्यामुळे वाद पेटण्याची  शक्यता आहे.

साईबाबांच्या शिर्डीत दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे शिर्डी नगरपंचायतला गावाच्या स्वच्छतेचा मोठा भार पडत असतो. साईभक्तांना शिर्डीत येताना प्रवेशकर द्यावा लागत होता. मात्र, भक्तांना हा त्रास होवू नये यासाठी 2005 साली शिर्डी संस्थानचे तात्कालीन अध्यक्ष कै. जयंत ससाणे यांनी शिर्डी स्वच्छतेसाठी नगरपंचायतला लागणारा निधी साईसंस्थानने देण्याचा निर्णय घेतला आणि

तेव्हापासून दर महिन्याला साईसंस्थान कडून नगरपंचायतला 42 लाख रूपये दिले जात होते.  मात्र, लॉकडाऊनच्या काळात गेल्या मे महिन्यापासून साईसंस्थान प्रशासनाने दिला जाणारा निधी अचानक बंद केल्याने नगरपंचायत समोर स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दर महिन्याला स्वच्छता करण्याचा ठेका दिलेल्या कंपनीला पेमेंट करणं अवघड झाले आहे.

साई संस्थानने कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानक निधी देणं बंद केल्याने आता प्रवेशकर गोळा करण्याचा ठराव नगरपंचायतने केला आहे. शिर्डी नगरपंचायतवर भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत नगरपंचायतची अडचण दूर करण्यासाठी आता साईभक्तांकडून प्रवेशकर आणी स्वच्छता कर आकारणी सुरू करण्यात येणार आहे.

नगरपंचायतीने राज्य सरकारकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असून राज्य सरकारच्या परवानगी नंतर शिर्डीच्या प्रवेशद्वारावर कर गोळा करण्यासाठी नाके सुरू होवू शकतात. भाजपाचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी केलेल्या या ठरावाला राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी मात्र विरोध केला आहे.

शिर्डीच्या प्रवेशद्वारावर टोलनाके सुरू होवू देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या नाक्यांना परवानगी देणार का? आणि शिर्डीच्या स्वच्छतेचा प्रश्न सुटणार का हाच खरा प्रश्न आहे. दोन वेळा स्वच्छतेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी शिर्डी आगामी काळातही स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी राहणार,  का हा ही प्रश्न आहे.

First published:

Tags: Maharashtra, Sai Baba Of Shirdi (Deity), Shirdi