मुंबई, 4 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर विविध तर्कवितर्क केले जात असताना आता या प्रकरणात राजकारणाचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे. भाजप नेते नारायण राणे सुशांत सिंह प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन ही हत्या असल्याचा दावा केला आहे व शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर आरोप केला आहे.
यामध्ये शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी एक नोट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी हे गलिच्छ राजकारण असल्याचे नमूद केले आहे. आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी सुशांत सिंह प्रकरणात लावण्यात आलेल्या आरोप फेटाळले असून हे गलिच्छ राजकारण असल्याचे वक्तव्य केलं आहे. मुंबईतील बॉलिवूड हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. यामध्ये अनेकांनी चांगले संबंध आहे. याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे ते यावेळी म्हणाले. याबाबत त्यांनी सविस्तर नोट लिहिली असून ती ट्विट केली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकार विरुद्ध बिहार सरकार असा सामना रंगला आहे. या वादात आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी गंभीर आरोप करत राज्य सरकारवर टीका केली आहे.
'सुशांतची आत्महत्या नसून ही हत्याच आहे. पोलीस योग्य दिशेनं तपास करत नाही. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अजून एफआय आर दाखल केला नाही. पण बिहारमध्ये दाखल झाला आहे. गेल्या 50 दिवसात आरोपींचा शोध मुंबई पोलिसांनी का लावला नाही' असा सवाल राणेंनी उपस्थितीत केला.