कल्याण, 23 मे : डोंबिवलीतील कोरोना रुग्णाला रुग्णवाहिका नसल्याने रुग्णालयात चालत येण्याचा सल्ला दिल्याची घटना ताजी असताना आज सायंकाळी कल्याण पूर्वेतील कोरोना संशयित वृद्ध चौथ्या मजल्यावरुन सरपटत खाली आले. मात्र ते आल्यानंतर त्यांना घेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका निघून गेली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन कल्याण डोंबिवली महापालिकेला कोरोना रुग्णांची किती काळजी आहे? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. कल्याण पूर्वेतील हनुमाननगरातील दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ते एका चार मजली इमारतीत राहतात. त्यांना कोरोना झाल्याने त्यांच्या घरातील त्यांचे 71 वर्षीय वडील व आई हे दोघे कोरोना संशयित रुग्ण आहेत. त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मुलांनी फोन केला. या दोन्ही वृद्धांना घेण्यासाठी रुग्णवाहिका सोसायटीच्या दारात आली. दरम्यान, या दोन्ही वयोवृद्धांना चालण्याचा त्रास असल्याने ते दोघेही चौथ्या मजल्यावरुन सरपटत खाली आहे. ते खाली आल्यावर त्यांना घेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका निघून गेली होती. रुग्णवाहिकेच्या चालकने थांबण्यास नकार दिला. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. घटनेचे कथन त्यांच्या मुलांनी व्हीडीओत केले आहे. महापालिकेकडे 33 रुग्णवाहिका आहे. त्यापैकी काही रुग्णवाहिका महापालिकेच्या आहे. बहुतांशी रुग्णवाहिका या भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या आहेत. रुग्णवाहिका चालकांना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते. त्यांच्या चाचण्या करण्यात आलेल्या नाहीत. त्यांना सोयी सुविधा दिलेल्या नाही. खासगी रुग्णवाहिकांवर महापालिकेचे नियंत्रण नाही. त्याचाच फटका या वयोवृद्धांना बसला आहे. मात्र रुग्णवाहिका चालकाचा उपवास होता. उपवास सोडण्याची वेळ सायंकाळी सात वाजता होती. त्यामुळे रुग्णवाहिका चालक उपास सोडण्यास गेल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.