कल्याण, 13 जुलै : नेहमीच्या पद्धतीपेक्षा हटके विचार करत निर्मिती करणाऱ्या मंडळींबद्दल सर्वांनाच कुतूहल असतं. त्यापैकी काही जणांच्या संशोधनाला ‘जुगाडू’ हे अस्सल भारतीय नाव देण्यात आलंय. आपल्या आजूबाजूला असे अनेक जुगाडू मंडळी आहेत. जे आपलं डोकं चालवून एखाद्या वेगळ्याच गोष्टीची निर्मिती करतात. कल्याणच्या अनिरुद्ध शेटे या तरुणानं देखील एक जुगाडू गाडी बनवलीय. तो ही गाडी रस्त्यावर चालवतो त्यावेळी सर्वजण त्याकडं कुतुहलानं पाहतात. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या ‘सह्याद्री ऑफ रोड चॅलेंज स्पर्धेत’ अनिरुद्धनं या गाडीच्या जोरावर बाजी मारलीय. काय आहे वैशिष्ट्य? अनिरुद्धकडे जिप्सी गाडी आहे. या गाडीचे इंजिन त्याने मॉडीफाय केले आहे. इंजिनची 1600 क्युबिक कॅपासिटी असून ही गाडी पंजाबमध्ये बनवल्याचं अनिरुद्धनं सांगितलं. या गाडीमध्ये मारुती सुझुकीच इंजिन वापरल असून काही पार्टस महेंद्र पीकअपचे आहेत.
नॉर्मल गाडीला फक्त पुढे स्टेरिंग असते. ह्या गाडीला मागेसुद्धा स्टेरिंग असल्याने पुढचे टायर जसे वळतात अगदी तसेच मागचे टायरही वळतात. या गाडीची किंमत जवळपास 15 लाख असून अशा प्रकारची ही महाराष्ट्रामधील एकमेव गाडी असल्याचं अनिरुद्धनं सांगितलं. या गाडीच्या बाहेर असलेल्या रॉडमुळे गाडी पलटी झाली तरी गाडीत बसलेल्यांना कोणताही त्रास होणार नाही, अशी काळजी घेण्यात आलीय, असा त्याचा दावा आहे. ऑफरोड स्पर्धा म्हणजे काय ? पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक बाईक आणि स्पोर्ट्स कार चालकांना अतिशय अवघड अशा ऑफरोड स्पर्धांचे वेध लागतात. गेल्या 3 वर्षांपासून या अवघड तसंच ड्रायव्हरच्या कौशल्य आणि संयमाची परीक्षा घेणारी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत राज्यभरातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. चांद्रयान मोहिमेचं मुंबईशी खास कनेक्शन, ‘या’ कंपनीत तयार झालं यानाचं इंजिन या स्पर्धेसाठी नेहमीच्या वापरातील जीप किंवा त्या पद्धतीच्या चारचाकी गाड्या (4×4) विशेष पद्धतीने मॉडीफाय केल्या जातात. ज्यातून त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासह या अवघड अशा स्पर्धेसाठी त्यांना तयार केले जाते. ज्या ट्रॅकवर ही स्पर्धा खेळवली जाते तो सरळ ट्रॅक नसतो. कधी चिखलाचा खड्डा तर कधी थेट टेकडीवरील अवघड चढण अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये ड्रायव्हरला गाडी चालवावी लागते. या स्पर्धेमध्ये गाडीसोबत ड्रायव्हरच्या कौशल्याचाही चांगलाच कस लागतो. या स्पर्धेत अनिरुद्ध आणि त्याचा सहकारी आकाश मलबारी यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे सलग दुसऱ्यांदा अनिरुद्धने ही स्पर्धा जिंकत त्याचा दबदबा निर्माण केलाय. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस म्हणून त्यांना आयोजकांकडून गाडीचे महागडे चार टायर देण्यात आले.